अस्वलाच्या हल्ल्यात तीन शेतकरी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 13:50 IST2021-04-17T13:48:56+5:302021-04-17T13:50:06+5:30
Bhandara News : हल्ला करणारे अस्वल एकच असून तीनही गावे एकमेकांना लागून आहेत.

अस्वलाच्या हल्ल्यात तीन शेतकरी गंभीर जखमी
लाखांदूर (भंडारा) - शेतात कामासाठी गेलेल्या तीन शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना लाखांदूर तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. हल्ला करणारे अस्वल एकच असून तीनही गावे एकमेकांना लागून आहेत.
खुशाल देवाजी खरकाटे (४९) रा. गवराळा, कुंदन बालाजी बावणे (२५) रा. खैरणा आणि मोरेश्वर नामदेव राऊत (३२) रा. डाभेविरली अशी जखमींची नावे आहे. हे तिघेही शनिवारी सकाळी आपल्या गावशिवारातील शेतात कामासाठी गेले होते. सर्वप्रथम डाभेविरली येथे मोरेश्वर राऊत यांच्यावर या अस्वलाने हल्ला केला. त्या नंतर गवराळा येथे खुशाल खरकाटे व शेवटी खैरणा येथे कुंदन बावणेवर हल्ला केला.
एकापाठोपाठ एक हल्ला करत अस्वल वैनगंगा नदी पात्रातून ब्रम्हपरी जंगल्या दिशेने पळून गेले. अस्वलाने हल्ला केल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तिघांनाही लाखांदूरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मोरेश्वर राऊत यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना भंडारा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. परिसरात भीतीचे वातावरणात पसरले आहे.