१५ रुपयांची नाथजल पाण्याच्या बॉटलसाठी घेतात २० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:32 IST2025-02-24T12:31:47+5:302025-02-24T12:32:14+5:30

Bhandara : बाटली बंद पाण्यासाठी द्यावे लागताहेत जादा पैसे

They charge Rs 20 for a Rs 15 bottle of Nathjal water. | १५ रुपयांची नाथजल पाण्याच्या बॉटलसाठी घेतात २० रुपये

They charge Rs 20 for a Rs 15 bottle of Nathjal water.

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
बाटली बंद पाण्याच्या नावाखाली शहरातच नव्हे, तर गाव खेड्यात देखील अगदी गल्ली-बोळांमध्ये फिल्टरचे पाणी अगदी सहज मिळत आहे. यात एसटी महामंडळासह रेल्वे विभाग देखील मागे राहिलेला नाही. महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ आणि रेल्वे विभागाने देखील प्रवाशांकरिता नाथजलच्या आणि रेल नीर नावाने बाटली बंद पाणी सेवा सुरू केली आहे. यातून एसटी किंवा रेल्वेचा पैसा कमावण्याचा उद्देश नसला तरी, पाणी विक्रीचे टेंडर दिलेल्या पाणी विक्रेत्यांकडून प्रवाशांना १५ रुपयांची पाण्याची बॉटल २० रुपये, अशा चढ्या दराने विक्री करण्यात येत आहे.


'लोकमत'ने काय पाहिले?
रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या नाथजल पाणी बॉटल विक्री स्टॉलवर नाथजलसह इतर कंपनीच्या देखील बॉटलची विक्री केली जाते. मात्र, यासाठी प्रवाशांकडून थंड पाणी बॉटलच्या नावाखाली जादा दर आकारून पाण्याची विक्री केली जाते. 


१५ ची बॉटल २० रुपयांना
रेल्वे स्थानक: रेल्वे स्थानकामध्ये दोन पाणी बॉटलचे स्टॉल आहेत. यातील एका स्टॉलवर १५ रुपयांची पाणी बॉटल चक्क २० रुपयांना विक्री केली जाते.
बस स्थानक : एसटी महामंडळाकडून सुरू करण्यात आलेल्या नाथजलची थंड पाणी बॉटल चक्क २० रुपयांना विक्री करण्यात येत आहे. प्रवाशांना देखील नाईलाजाने पाणी विकत घ्यावे लागते.


थंड करण्याचे पाच रुपये
बंद पाण्याची थंड बॉटल हवी असल्यास प्रवाशांकडून जास्तीचे ५ रुपये मोजावे लागतात. एखाद्या प्रवाशाने पाण्याच्या बाटलीवरील छापील दर आणि प्रत्यक्षात त्यांच्याकडून घेतले जाणारे जास्तीचे पैसे या बद्दल विचारणा केली असता, पाणी थंड करण्याचे जादा पैसे लागतात असे उत्तर मिळते. त्यामुळे तक्रार कुठे करावी असा प्रश्न आहे.


तक्रार कोठे करायची?
एसटी महामंडळ असो की, रेल्वे स्थानक दोन्ही ठिकाणी स्थानक प्रमुख असतो. स्थानक प्रमुख हे प्रवाशांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेणे, परिसरातील हालचालींवर करडी नजर ठेवणे व समस्यांचे निवारण करणे हे मुख्य काम करतात. यांच्याकडे तक्रार करता येते. मात्र अनेकांना प्रवासाची घाई असल्याने कुणी तक्रार करत नाही. 


"एसटी बसस्थानकातील सीलबंद पाण्यासाठी जास्तीचे पैसे घेऊन पाणी विक्री केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येते. नाथजल पाण्याची जादा दराने विक्री करतानाची तक्रार प्राप्त झाल्यानंतरच स्टॉल चालकावर दंड आकारण्यात येऊ शकतो."
- विजय गिदमारे, बसस्थानक प्रमुख


"रेल्वे स्थानकात पाण्याची थंड बॉटल विकत घेण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. छापील दरापेक्षा जास्त पैशांबद्दल संबंधित व्यक्तीकडे विचारणा केल्यास त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. उलट घ्यायचे तर घ्या नाही, तर सोडा असे उत्तर मिळते."
- महेंद्र तिरपुडे, प्रवासी.

Web Title: They charge Rs 20 for a Rs 15 bottle of Nathjal water.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.