कृषी योजनांसाठी 'लॉटरी' संपली! आता 'पहिला अर्जदार असेल पहिला लाभार्थी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 19:21 IST2025-08-20T19:19:10+5:302025-08-20T19:21:46+5:30
शेतकऱ्यांना नवा नियम: लॉटरी बंद, अर्ज करणाऱ्यांना थेट लाभ

The 'lottery' for agricultural schemes is over! Now 'the first applicant will be the first beneficiary'
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता लॉटरी पद्धत (लकी ड्रॉ) बंद करण्यात आली आहे. कृषी विभागाने केलेल्या या महत्त्वपूर्ण बदलानुसार, आता 'प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर योजनांचा लाभ दिला जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून, अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या नव्या धोरणामुळे प्रक्रिया सुलभहोणार असून, पारदर्शकता येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी योजना
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत सुधारणा करण्यासाठी शासकीय योजना उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पंप संच, शेडनेट, पॉलिहाऊस, सिंचन विहीर, कृषी यांत्रिकीकरण यासारख्या योजनांचा समावेश आहे.
अशी होती आधीची लकी ड्रॉ योजना
आतापर्यंत कृषी योजनांच्या लाभासाठी लॉटरी पद्धत वापरली जात होती. शेतकरी मोठ्या संख्येने अर्ज करत असले, तरी फक्त सोडतीत ज्या शेतकऱ्यांचे नाव येईल.
पुन्हा-पुन्हा काढायचे सोडत
लॉटरी पद्धतीमध्ये एकाच योजनेसाठी अनेकवेळा सोडत (ड्रॉ) काढावी लागत असे. काहीवेळा पात्र लाभार्थी उपलब्ध नसतात किंवा कागदपत्रे वेळेवर जमा करत नाहीत.
लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा
नवीन धोरणानुसार, शेतकऱ्यांना आता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करताना शेतकऱ्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. या पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे.
'प्रथम येईल त्याला प्राधान्य'
या सर्व अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाने आता 'प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य' हे नवीन धोरण लागू केले आहे. यानुसार, जो शेतकरी आधी अर्ज करेल आणि त्याची कागदपत्रे पूर्ण असतील, त्याला योजनेचा लाभ आधी दिला जाईल.
"'लॉटरी पद्धतीत अर्ज करूनही अनेकदा निराशाच येत होती. आता 'प्रथम येईल त्याला प्राधान्य' या धोरणामुळे एकदा अर्ज केल्यावर लाभ मिळेल."
- धनंजय वाहाणे, शेतकरी, खुटसावरी