मुलगा भोवरा फिरवतोय हेही टॅलेंटच; शैक्षणिक धोरणात नवा दृष्टिकोन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 15:54 IST2025-07-10T15:52:01+5:302025-07-10T15:54:39+5:30

Bhandara : मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसह सामाजिक, शारीरिक प्रगतीचे होणार निरीक्षण

The fact that a boy is spinning a wheel is also talent; A new approach in educational policy... | मुलगा भोवरा फिरवतोय हेही टॅलेंटच; शैक्षणिक धोरणात नवा दृष्टिकोन...

The fact that a boy is spinning a wheel is also talent; A new approach in educational policy...

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये २०२५ या शैक्षणिक वर्षापासून 'समग्र प्रगती पत्रक' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फायदा होणार आहे. मुलगा भोवरा फिरवतोय किंवा लंगडी खेळतोय, हेदेखील टॅलेंट म्हणून पाहिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांची सामाजिक, भावनिक, आणि शारीरिक प्रगतीदेखील दर्शवणारे मूल्यांकन केले जाणार आहे. यात केवळ गुण किंवा ग्रेडवर लक्ष केंद्रित न करता, विद्यार्थ्यांची कौशल्ये, क्षमता आणि त्यांची एकूण वाढ कशी होत आहे यावर लक्ष दिले जाणार आहे. या सर्व बाबी समग्र प्रगती पत्रकात पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि समूहातून मूल्यांकन करण्याची ही पद्धत आहे. 


'बहुआयामी बुद्धिमत्ता' म्हणजे काय ?
केवळ गुणच नाही तर सर्जनशील कौशल्ये, विचार, खेळ, भावनिक बुद्धिमत्ता, शारीरिक आरोग्य आणि सामाजिक-भावनिक विकासाचे मूल्यांकनातून बहुआयामी बुद्धिमत्ता साधता येणार आहे. 


'बहुआयामी' दृष्टिकोनातून होणार विद्यार्थ्यांचे मूल्यांकन
बहुआयामी दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिकच नाही, तर भावनिक, सामाजिक आणि शारीरिक विकासदेखील साधला जाणार आहे.


भोवरा फिरवणे, दांडपट्टा चालवण्यालाही महत्त्व

  • शिक्षणाबरोबरच भोवरा फिरवणे, लंगडी खेळणे, इतर खेळ, दांडपट्टा फिरविणे आदी विविध कौशल्ये मुले कशी प्राप्त करतात. याचे निरीक्षण या समग्र पत्रकात नोंदविले जाणार आहे.
  • समुदाय आधारित शिक्षणावर भर
  • समूह शिक्षणातून विद्यार्थ्यांचा विकास करणे हा उद्देश आहे.
  • सामूहिक कवायती, प्रार्थना, कविता, वाचन, गायन यातून मुलांना सक्षम केले जाणार आहे.


समग्र प्रगती पत्रकात असणार या बाबींची नोंद

  • सर्वांगीण प्रगती कार्ड हे विद्यार्थ्यांच्या वाढीचे एकंदर मूल्यांकन दर्शविणार आहे.
  • त्यांचा अभ्यास, वर्तन, कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्वाच्या विकासाची नोंद यात असणार आहे.


"राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात समग्र प्रगती पत्र ही मूल्यमापनाची अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे. विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून शिक्षक बांधवांनी नोंदी करणे आवश्यक आहे. स्थुलाकडून सूक्ष्माकडे वाटचाल करण्यासाठी हा उपक्रम विद्यार्थी हितासाठी फायदेशीर ठरणार आहे."
- रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, भंडारा.
 

Web Title: The fact that a boy is spinning a wheel is also talent; A new approach in educational policy...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.