वाचनालयात तरुणाचा गोळी झाडून खून; प्राध्यापकाने देशी कट्टा आणला कुठून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2022 14:42 IST2022-09-05T12:09:04+5:302022-09-05T14:42:23+5:30
भंडारा : वाचनालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचा देशी कट्ट्यातून गोळी झाडून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी उघडकीला ...

वाचनालयात तरुणाचा गोळी झाडून खून; प्राध्यापकाने देशी कट्टा आणला कुठून?
भंडारा : वाचनालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचा देशी कट्ट्यातून गोळी झाडून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी उघडकीला आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी गंगाधर निखारे या उच्चशिक्षित व तासिका प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्राध्यापकाजवळ देशी कट्टा आला कुठून? याचा शोध घेण्यात येत आहे.
भंडारा येथील अण्णाजी कुळकर्णी सार्वजनिक वाचनालयात शनिवारी दुपारी ३.३०च्या सुमारास गंगाधर निखारे याने जुन्या वैमनस्यातून अतुल बाळकृष्ण वंजारी (३०) याच्यावर देशी कट्ट्यातून गोळी झाडली. मात्र, उपचारादरम्यान अतुलचा मृत्यू झाला. या खून प्रकरणात वापरण्यात आलेला देशी कट्टा निखारे याने कुठून आणला? याचा शोध भंडारा पोलीस घेत आहेत. दरम्यान, हा कट्टा नागपूर येथून आणल्याचीही गोपनीय माहिती आहे.
चार दिवसांची पोलीस कोठडी
तरुणावर गोळी झाडून खून केल्याप्रकरणी गंगाधर निखारे याला अटक करून रविवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. भंडारा न्यायालयाने निखारेला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातच त्याने खून नेमक्या कोणत्या कारणाने केला, देशी कट्टा कुठून आणला? याचाही तपास भंडारा पोलीस करत आहेत.