शिक्षक म्हणतात, आम्हाला शिकवण्याचे काम करू द्या, बीएलओचे काम नकोच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 18:35 IST2025-07-31T18:33:57+5:302025-07-31T18:35:47+5:30
११३ शिक्षकांची नियुक्ती : अशैक्षणिक कामांचा ओझा

Teachers say, let us do the teaching work, not the BLO work
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : शिक्षकांचे मुख्य काम शिकवणे आहे. शिकवण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आहेत. त्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून मोकळीक हवी, अशी आर्त हाक शिक्षक व शिक्षक संघटनांनी तालुका व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
शाळाबाह्य व ऑनलाइनच्या कामांमुळे शिक्षक आधीच दमून जातो. शिक्षक अशैक्षणिक कामांमध्ये गुंतून राहत असल्यामुळे व त्यांचे शैक्षणिक कामांकडे बहुदा दुर्लक्ष होते. शिक्षणावर लक्ष केंद्रित होत नाही. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने, शिक्षकांना अशैक्षणिक कामातून वगळावे असे शासन निर्णय जारी केले आहेत. तरीही प्रशासनाने शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती केली आहे.
शिक्षक आता मतदारयादी तयार करणे, ती अद्ययावत करणे, निवडणुकीच्या कामात मदत करणे अशा कामात गुंतणार आहे. शिक्षकांवर बी.एल.ओ ची जबाबदारी सोपवल्यामुळे शिकवण्यावरचे लक्ष कमी होणार आहे. शिक्षकांना फक्त शिकविण्याचे काम करू द्या, इतर कामांमध्ये गुंतवू नका अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली.
काय सांगतो, शासन निर्णय २३ ऑगस्ट २०२४ चा
महाराष्ट्र शासनाच्या २३ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णय शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
शिक्षण संचालकाचे ते पत्र
शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांनी २ मार्च २०१५ ला शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना पत्र पाठवले. त्या पत्रात शिक्षकांना, दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवारणाची कामे, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधिमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकांची कामे वगळता कुठलीही अशैक्षणिक कामे देऊ नये असे पत्रात व १८ जून २०१० च्या शासन निर्णयाच्या नुसार नमूद केले आहे.
शैक्षणिक कामे
प्रत्यक्ष शिक्षणाची कामे, शिक्षणाशी संबंधित माहिती, संकलनाची कामे, विद्यार्थी लाभांच्या व शैक्षणिक विकासाच्या योजनाबाबतची कामे.
अशैक्षणिक कामे
स्वच्छता अभियान राबवणे, हागणदारीमुक्त अभियान राबवणे, विविध प्रकारची सर्वेक्षणे- पशुसर्वेक्षण शौचालय सर्वेक्षण, शिक्षण विभागांकडे कामाव्यतिरिक्त अन्य विभागांकडून देण्यात येणारे कामे अशा १४ शैक्षणिक कामांची यादी निर्णयात नमूद करण्यात आली आहे. त्यात मात्र, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची कामे नमूद नाहीत.
कर्मचारी बीएलओ
शिक्षक ११३
ग्राममहसूल अधिकारी २८
कृषी सहायक ०९
ग्रामपंचायत अधिकारी ०८
नगरपंचायत अधिकारी ०२
एकूण १६०
"क्लास फोरच्या कर्मचाऱ्यांना बीएलओचे काम देऊ नये असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यामुळे शिक्षकांना बीएलओचे काम देण्यात आले. राज्यात सर्वच जिल्ह्यात शिक्षकांना मतदारयादीचे काम देण्यात आले. तसेच ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांनाही बीएलओचे काम देण्यात आले."
- प्राजक्ता बुरांडे, तहसीलदार मोहाडी