नळाला पुरेसे पाणी येईना; वाढीव योजना असूनही नागरिक मात्र तहानलेलेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:19 IST2025-02-18T14:19:00+5:302025-02-18T14:19:42+5:30
Bhandara : भंडारा शहरातील हनुमान नगर आणि आनंदनगरातील व्यथा

Taps don't get enough water; despite increased plans, citizens remain thirsty
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्थानिक नगरपालिका प्रशासनाने वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मात्र नवीन नळजोडणी देऊनही आजही अनेकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड निर्माण झाली आहे. भंडाऱ्यातील तकीया वॉर्डाला लागून असलेल्या हनुमाननगर, आनंदनगर तथा समुद्धीनगरातील भागात नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.
नळधारक वाढल्याने ही अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. भविष्यकालीन वाढीव पाणीपुरठा योजना, असे या योजनेचे नाव असताना वाढणारी लोकसंख्या ही गृहीत धरण्यात आली नाही का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. वाढीव पाणीपुरवठ्यावर कोट्यवधींचा खर्च झाल्यानंतर आता पाणी मुबलक पाणी कसे मिळणार, हा नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे. नियोजनशून्यतेमुळे शहराच्या अन्य भागांतही नळाला पाणी येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. नदीत पाण्याची कमतरता नाही; पण मुबलक पाणी देण्यात प्रशासन कमी पडत आहे.
अन्य भागांतही समस्या
शहराच्या आनंदनगरासह अन्य भागांतही पाण्याची समस्या आहे. सदोष पाइपलाइनमुळे असो की अन्य कारणांमुळे येथील अनेक घरांना पुरेसे पाणी मिळत नाही.
मोफत पाणीपुरवठा
शहरातील मोजकेच माजी नगरसेवक पाणीटंचाई असलेल्या भागात स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत. हा उपक्रम ते कित्येक महिन्यांपासून राबवित आहेत.
नागरिकांना आर्थीक भूर्दंड
प्रशासनाच्या वतीने उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना केली जात नसल्याने शहरवासीयांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. सामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो.
अनेक गावांतील हातपंप आणि विहिरी तळ गाठतात.
शहरासह तालुक्याच्या अनेक गावांतील हातपंप आणि विहिरी तळ गाठतात. परिणामी, ग्रामीण महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. याकडे जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे समजते. शहराच्या स्लम परिसरात नळाची पाइपलाइन नाही. वाढीव वस्त्यांमध्ये पाण्याची समस्या आहे. नगरपालिका प्रशासनाची खूप जुनी नळ पाइपलाइन असल्याने पाण्याचे वितरण असमान होते. याचा फटका बऱ्याच कुटुंबांना बसत असतो.
उपाययोजना आवश्यक
फेब्रुवारीअखेर मार्च तसेच एप्रिल महिन्यांत या भागात नळाला पुरेसे पाणी येत नाही. तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी प्रशासनाने आधीच उपाययोजना करणे आवश्यक बाब आहे. मात्र याकडे गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज आहे.
३५ रुपये मोजून प्रतिकॅन दररोज पाणी घ्यावे लागत आहे
उन्हाळ्यात भंडारा शहरात नळाला पुरेसे पाणी येत नाही. नळाचे पाणी पिण्यायोग्यही नाही. बारमाही कॅन खरेदी करावी लागते. याचा नाहक भूर्दंड नागरिक सहन करतात.
उंच भागात पाणी मिळेना..
- शहरातील म्हाडा कॉलनी परिसर, खात रोड भाग, शुक्रवारी परिसर तसेच उंच भागात नळाला पुरेसे पाणी मिळत नसल्याची माहिती आहे.
- उन्हाळ्यातील दोन-तीन महिने पाण्याची समस्या भेडसावते. या भागांमध्ये टँकरने पाणी देण्याची गरज निर्माण झाली आहे.
- उल्लेखनीय म्हणजे शासकीय दप्तरी टँकरमुक्त जिल्हा म्हणून नोंद आहे, हे येथे उल्लेखनीय