कर्जाच्या विळख्यातील शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: December 4, 2023 17:37 IST2023-12-04T17:36:15+5:302023-12-04T17:37:20+5:30
पतसंस्थेने वकिलामार्फत दिले होते २.३६ लाखांच्या वसुलीसाठी पत्र.

कर्जाच्या विळख्यातील शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू
गोपालकृष्ण मांडवकर,लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा : थकित कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या एका तरुण शेतकऱ्याने जीव गमावला. राजेश जनीराम पागोटे (४५, मऱ्हेगाव तालुका लाखनी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी पहाटे त्याची प्रकृती खालावल्याने त्यांना पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणी पूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्यांच्यावर खासगीतील एका पतसंस्थेने २ लाख ३६ हजार ८३५ रुपयांचे कर्ज होते. त्या अनुषंगाने तालुका न्यायालयाने पतसंस्थेच्या वकिलामार्फत वसुलीसाठी पत्र दिले होते. यापूर्वी सुद्धा सदर पतसंस्थेने कर्ज वसुलीच्या दृष्टीने पत्रव्यवहार केला होता. त्याचा धसका घेऊन हृदयविकारातून त्यांचा मृत्यू झाला असावा, किंवा आत्महत्या केली असावी, असा आरोप मृताच्या भावाने केला आहे.
पालांदूर पोलिसांनी या प्रकरणी मार्ग दाखल केला असून तपास सुरू आहे. पार्थिव शवविच्छेदनकरिता पाठविले आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच नेमके कारण कळू शकेल. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असलेले मृताचे भाऊ दिनेश पागोटे यांनी, कर्जाचा बोजा असह्य झाल्यानेच आपल्या भावाने मृत्यूला कवटाल्याचा आरोप केला आहे.