ग्रेस गुण साठी आपले सरकार पोर्टलवर आता विद्यार्थ्यांना करावा लागणार ऑनलाइन अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:05 IST2025-02-21T13:04:58+5:302025-02-21T13:05:44+5:30
Bhandara : आपले सरकार पोर्टलवर करावा लागणार अर्ज : ऑनलाइन अर्ज केला का?

Students will now have to apply online on the Aaple Sarkar portal for grace marks.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : क्रीडा स्पर्धेत यश मिळविले असल्यास इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा ग्रेस गुण दिले जातात. यासाठी पूर्वी ऑफलाइन अर्ज स्वीकारले जात होते. आता क्रीडा ग्रेस गुण प्राप्त करण्यासाठी आपले सरकार सेवा पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
प्रत्येक वर्षी दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ऑफलाइन अर्ज मागविले जातात. त्या माहितीचे संकलन करून क्रीडा कार्यालयाद्वारे सदरचे अर्ज माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळास क्रीडा ग्रेस गुण मिळण्याकरिता पाठविले जातात.
सन २०२३-२४ पर्यंतची ग्रेस गुण प्रक्रिया काही मानवी उणिवांमुळे क्लिष्ट होत होती. सवलत गुण प्रक्रिया निर्दोष करण्यासाठी २०२४-२५ पासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रेस गुण घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
अंतिम तारीख काय?
क्रीडा ग्रेस गुण मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासंदर्भातील अंतिम तारीख काय आहे, याची माहिती आपले सरकार पोर्टलवर सध्या तरी दिसून येत नाही.
कोणत्या खेळांसाठी हे गुण लागू?
जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा प्रावीण्यासाठी सवलत गुणांसाठी केवळ ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. वैयक्तीक व सांघिक खेळांचा समावेश आहे.
ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही
कोणताही खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालयास अथवा शिक्षण मंडळास ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणार नाही व अशा प्रकारच्या ऑफलाइन अर्ज कोणत्याही जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून स्वीकारला जाऊ नये, अशी बाब मुख्यालयाच्या निदर्शनास आली तर होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित जिल्हा क्रीडाधिकारी जबाबदार राहतील.
कोणती कागदपत्रे ?
दहावी, बारावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्यासंदर्भात हॉल तिकीट, क्रीडा प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
संस्थांची जबाबदारी काय?
सर्व शाळा व महाविद्यालय प्रमुखांनी पात्र विद्यार्थ्यांना या सूचनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, एकही पात्र विद्यार्थी वंचित राहणार नये, याची जबाबदारी संस्थेवर राहणार आहे. सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज कसा करणार?
खेळाडू विद्यार्थी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांना आपले सरकार अॅपद्वारे या वर्षीपासून क्रीडा ग्रेस सवलत गुणांचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे.