भंडाऱ्यात कोविड केअर सेंटरमधील स्मोक अलार्म वाजताच उडाली धावपळ, सत्य समजाताच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 20:22 IST2021-04-17T20:21:46+5:302021-04-17T20:22:42+5:30
जिल्हा रुग्णालयातील घटना : केरकचरा पेटविल्याने झाला धूर

भंडाऱ्यात कोविड केअर सेंटरमधील स्मोक अलार्म वाजताच उडाली धावपळ, सत्य समजाताच...
भंडारा : कोविड केअर सेंटरच्यालगत पेटविलेल्या केरकचऱ्यामुळे वाजलेल्या स्मोक अलार्मने जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एकच गोंधळ उडाला. अग्नीशमन दलासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. खरा प्रकार पुढे आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र तोपर्यंत सर्वांचा जीव टांगणीला लागला होता.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नीतांडवाची घटना ताजी असताना शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कोविड केअर सेंटरमधील स्मोक अलार्म वाजायला लागला. आग लागल्याची ही सूचना बघता सर्वांची एकच धावपळ उडाली. अग्नीशमन दलासह पोलिसांना पाचारण करण्यात आले. काही वेळात खरा प्रकार उघडकीस आला. कोविड केअर सेंटर आणि सहकार्याच्या मधल्या मोकल्या जागेत केरकचरा पेटविण्यात आला होता. मोठा भडका होईल म्हणून ही आग तेथे उपस्थितांनी विझविली. मात्र मोठा धूर झाला आणि तो लगतच्या कोविड केअर सेंटरमध्ये पोहचला. त्याठिकाणी असलेल्या स्मोक अलार्मने धोक्याचा इशारा दिला.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी संदीप कदम, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, शहरचे ठाणेदार लोकेश काणसे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच भंडारा नगरपरिषदेचे अग्नीशमन दलही तात्काळ रुग्णालयात पोहचले. या घटनेने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकात भीतीचे वातावरण पसरले होते. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे अग्नीतांडव घडले होते. यात दहा निष्पाप बालकांचा बळी गेला होता. त्यानंतर रुग्णालयाच्या विविध विभागात स्मोक अलार्म लावण्यात आले होते. अचानक कोविड सेंटरमध्ये शिरलेल्या धुरामुळे हा गोंधळ उडाला.