भंडारा जिल्ह्यातील शिवालये बनली शक्तिस्थळे ! शिवमूठ परंपरा काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:54 IST2025-07-28T17:54:18+5:302025-07-28T17:54:56+5:30
Bhandara : गायमुख येथे पंचमुखी भोला शंकर हनुमान अंबाबाई गोरखनाथ मंदिर, तसेच पंचमुखी भोला शंकराचे मंदिर भारतातील विद्यमान १८ मंदिरापैकी एक आहे.

Shiva temples in Bhandara district have become places of power! What is the Shivamuth tradition?
भंडारा : जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक शिवालये श्रद्धा व भक्तीची केंद्र आहेत. विशेषतः महाशिवरात्री व श्रावण महिन्यात येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. या मंदिरांचे इतिहास, लोकपरंपरा आणि निसर्गरम्य परिसर भक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. भंडारा येथील ग्रामदेवता श्री बहिरंगेश्वर मंदिर, चैतन्येश्वर महादेव (आंभोरा), गायमुख देवस्थान, पवनी येथील प्राचीन शिवमंदिर यांसह चकारा महादेव देवस्थान शिवालयांत श्रावण महिनाभर विविध धार्मिक अनुष्ठान होणार आहेत.
स्थानिक लोकांच्या श्रद्धेमुळे या ठिकाणांना मनोकामना पूर्ण होणारी ही शिवालये नावारूपास आली आहेत. शिव-शक्ती उपासनेसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंदिरांनी भंडारा जिल्ह्याला एक धार्मिक ओळख करून दिली आहे. सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले गायमुख हे स्थान श्रावण महिन्यात भक्तांच्या गर्दीने फुलून जाते. लहान महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तीर्थक्षेत्रास 'विदर्भाचे नैनिताल', अशी उपमा मिळाली असली तरी, अद्यापही हे ठिकाण विकासाच्या दृष्टीने कोसोदूर आहे. गायमुख परिसराची भौगोलिक रचना अत्यंत नयनरम्य आहे. सातपुडा पर्वताचे घनदाट अरण्य, डोंगर दऱ्या, झुळझुळ वाहणारे पाणी, टेकडीवरून पडणारे पाणी आणि शुद्ध प्राणवायू यामुळे येथे आल्यावर मंत्रमुग्ध होतो. धुक्याची पर्यटक चादर पांघरलेली डोंगररांग, झाडाझुडपांवरून वाहणारे
पाणी, नागमोडी रस्ता, हे दृश्य डोळ्यात साठवणारे असते.
श्रावण सोमवार, उपवासाचे महत्त्व !
किटाडी : हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. २५ जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. धार्मिक दृष्टिकोनातून या महिन्यात हिंदू धर्म अनुयायी उपवास, पूजापाठ तसेच ग्रंथ पारायण यात रममाण झालेले असतात. हिंदू पंचांगानुसार शक संवत कालदर्शिका श्रावण महिना हा पाचवा महिना आहे.
सणांचा महिना श्रावण
श्रावण महिन्यात केवळ श्रावणी सोमवारच नव्हे तर, वर्षातील सर्वात जास्त धार्मिक सण आणि उत्सव येतात. श्रावण महिन्यात दीप पूजा, हरियाली अमावस्या, नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला, बैल पोळा, तान्हा पोळा आदी सण उत्साहाने साजरे केले जातात. श्रावण महिन्यात सण आणि उत्सवांचा एक वेगळाच उत्साह अनुभवायला मिळतो.
श्रावण महिन्यातील धार्मिक महत्त्व
श्रावण महिन्याच्या दर सोमवारी, तसेच नागपंचमी, महाशिवरात्र यासारख्या सणांदरम्यान हजारो भाविक 'गायमुख' येथे जलाभिषेकासाठी गर्दी करतात. येथे असलेला 'गायमुखी' स्वरूपाचा जलप्रपात ही मुख्य आकर्षण स्थळे आहेत. गायमुख हे केवळ निसर्गसौंदर्य व धार्मिक श्रद्धेमुळेच टिकून आहे. मात्र, श्रावण महिन्यात होणाऱ्या गर्दीमुळे या समस्यांची तीव्रता अधिक जाणवते. शासन व पर्यटन विकास महामंडळाने लक्ष घालून गायमुखचा सर्वांगीण विकास केल्यास हे ठिकाण विदर्भातील प्रमुख पर्यटन केंद्र नावारूपास येईल.
देशातील १८ मंदिरांपैकी एक
गायमुख येथे पंचमुखी भोला शंकर हनुमान अंबाबाई गोरखनाथ मंदिर, तसेच पंचमुखी भोला शंकराचे मंदिर भारतातील विद्यमान १८ मंदिरापैकी एक आहे. पहाडावर गोरखनाथ मंदिरात जायला येथे एक लहानसा पायऱ्यांच्या रस्ता आहे. तसेच आंभोरा, पवनी, नेरला डोंगरला महादेव, कोरंभी महादेव आदी मंदिरातही गर्दी पाहायला मिळणार आहे.
शिवमूठ परंपरा
श्रावण सोमवारी भगवान शंकराची उपासना करण्यासोबतच 'शिवमूठ' अर्पण करण्याची परंपरा आहे. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी ही शिवमूठ शंकराला अर्पण करतात. दर सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची शिवमूठ अर्पण केली जाते. यामागे निसर्गसंपत्तीचे जतन आणि ऋतुनुसार आरोग्यवर्धक धान्याचे सेवन असा उद्देश असल्याचे सांगितले.