शाळकरी वाहने मुलांसाठी धोकादायक ! विदर्भ माहिती अधिकार संघटनेकडून कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:10 IST2025-01-17T12:09:55+5:302025-01-17T12:10:47+5:30
Bhandara : ८० च्या वेगाने चालविली जातात स्पिड लॉक तोडून वाहने

School vehicles are dangerous for children! Vidarbha Right to Information Organization demands action
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नियमबाह्य शाळकरी वाहने मुलांसाठी धोकादायक असल्याने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ माहिती अधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्रकुमार वर्मा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शेकडो स्कूल बसेस, ओमनी व्हॅन्स व रिक्षा शाळकरी मुलांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येतात, मात्र यापैकी अनेक गाड्या नियमांना फाटा देत आहेत. सध्या अनेक बसेस व वाहने फिटनेस सर्टिफिकेट व इन्शुरन्स शिवाय रस्त्यावर धावत आहेत. काही वाहनांचे इन्शुरन्सही कालबाह्य झाले आहेत. परमिट एका शाळेसाठी असताना गाड्या इतर शाळांसाठी वापरण्यात येतात. याशिवाय, स्पीड लॉक तोडून गाड्या ७०-८० च्या वेगाने चालवल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. शिष्टमंडळात संघटनेचे प्रवीण मेहर, भविश नागपुरे, सचिन हटवार, अमित खैरकर, अतुल गणवीर, मिथुन बोरकर आदींचा समावेश होता.
अशा आहेत मागण्या
शाळांनी परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक असले तरी, अनेक शाळा या बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आहे. तात्काळ तपासणी व कडक कारवाई करण्यात यावी. तसेच सर्व शाळांनी परिवहन समिती स्थापन करून आरटीओ कार्यालयात अहवाल सादर करावा.
मुलांच्या सुरक्षेला मोठा धोका
ओमनी व्हॅन्स व रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांची वाहतूक केली जात आहे, ज्यामुळे मुलांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होत आहे. तसेच, काही वाहनांमध्ये मुलांना चक्क सीएनजी टाकीवर बसवले जात आहे.