जिल्ह्यातील वन्यजीव कॉरिडॉरसाठी निधीची वानवा; दोन महिन्यात सहा वाघ व एका बिबट्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:35 IST2025-03-03T16:31:53+5:302025-03-03T16:35:40+5:30

Bhandara : आज जागतिक वन्यजीव दिवस; जनजागृतीची गरज

Scarcity of Funding for wildlife corridors in the district; Six tigers and one leopard died in two months | जिल्ह्यातील वन्यजीव कॉरिडॉरसाठी निधीची वानवा; दोन महिन्यात सहा वाघ व एका बिबट्याचा मृत्यू

Scarcity of Funding for wildlife corridors in the district; Six tigers and one leopard died in two months

इंद्रपाल कटकवार 
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
जिल्ह्याला निसर्गाने मुक्त हस्ताने साधन संपत्तीची उधळण केली आहे. जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी जंगलांचे प्रमाणही भरपूर आहे. त्या दृष्टीने वन्यप्राण्यांची व जंगलांची संख्याही उत्तम आहे; परंतु मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या वन्यजीव कॉरिडॉर निर्मितीला 'खो' दिला जात आहे. निधीची वानवा हेच यामागील प्रमुख अडचण आहे. ३ मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक वन्यजीव दिवस साजरा केला जात असतो.


दोन महिन्यात सहा वाघ व एका बिबट्याचा मृत्यू
कोका कन्हांडला अभयारण्य, नागझिरा अभयारण्यातील ४० टक्के हा जिल्ह्यात येतो. तुमसर व लाखांदूर, पवनी तालुक्यांत जंगल क्षेत्रासह वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष यांची विविधता वस्तूतः थक्क करणारी आहे. निसर्गाची, पशुपक्ष्यांसह जंगलातील वनसंपदेची कत्तल होत आहे. वन्यप्राण्यांची व इतर घटकांची शिकार, चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले आहे. जिल्ह्यात गत दोन महिन्यात सहा वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. यात मृत पावलेल्या वाघांपैकी दोन ते अडीच महिन्यांच्या दोन छावकांचा समावेश होता. कुण्या घटनेने असो की शिकार, वन्यप्राण्यांचा जीव वाचविणे अत्यंत आवश्यक आहे.


इच्छाशक्तींचा अभाव
जागतिक वन्यजीव दिन हा केवळ एक दिवसाचा उत्सव नाही. ग्रीन हेरिटेज पर्यावरण संस्थेने पर्यावरण बचावासाठी अनेकदा शासनाला निवेदने दिली. निधीची तरतूद होणे अपेक्षित होते. राजकीय इच्छाशक्तींचा अभाव व निधीअभावी हरित व व्याघ्र कॉरिडॉरचा प्रस्ताव धूळखात आहे.


धोका असलेल्या वन्य सृष्टीला वाचविणे गरजेचे

  • याबाबत जाणीव जागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ (युनोने) वन्यजीव दिवस साजरा करण्याचे ठरविले. धोका असलेल्या वन्य सृष्टीला, आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा ३ मार्च १९७३ रोजी १८० देशांनी मान्य केला. म्हणून ३ मार्च या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
  • वाढते शहरीकरण ही बाब जंगलतोड, शेतीसाठी जमिनीचे रूपांतरण, अधिवास नष्ट होण्यास महत्त्वाचे योगदान देतात. निसर्गाकडे लक्ष देत जल, जंगल, जमीन, जनावरे, पक्षी व अन्य जीवांचे संरक्षण करण्यासाठी जमिनीवर सक्रियपणे काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक हातभार लावणे आज अत्यंत आवश्यक आहे.


"वन्यजीव व मानव यांच्यातील संघर्ष न होण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचे सांगते. मात्र, त्याच्या अंमलबजावणी -साठी निधीची गरज आहे. भंडारा जिल्ह्यात व्याघ्र कॉरिडॉरसह हरित क्षेत्राला संरक्षित करण्यात दृष्टीने मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. शासनाला यासाठी वेळोवेळी निवेदने देण्यात आली; परंतु वन्यजीव कॉरिडॉरचा प्रस्ताव आजही अधांतरी आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे."
- मो. सईद शेख, संस्थापक, ग्रीन हेरिटेज पर्यावरण संस्था, भंडारा
 

Web Title: Scarcity of Funding for wildlife corridors in the district; Six tigers and one leopard died in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.