Scam Alert : फॉर्मवर सह्या घेतल्या, पण खातेच उघडलं नाही; महिलांसोबत ३४ लाखांचा बचत गट घोटाळा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 17:17 IST2025-08-28T17:16:08+5:302025-08-28T17:17:48+5:30

Bhandara : ३२ लाख रूपयांचा घोटाळा उघडकीस, तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल

Scam Alert: Signatures were taken on the form, but the account was not opened; 34 lakhs worth of savings group scam with women | Scam Alert : फॉर्मवर सह्या घेतल्या, पण खातेच उघडलं नाही; महिलांसोबत ३४ लाखांचा बचत गट घोटाळा उघड

Signatures were taken on the form, but the account was not opened; 34 lakhs worth of savings group scam with women

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
गणेशपूर येथील महिलांना विश्वासात घेऊन सहा बचत गट स्थापन करण्यात आले. त्यासाठी गोळा केलेली २ लाख ८ हजार रुपयांची रक्कम गडप करण्यात आली. एवढेच नाही तर, त्या सहाही बचत गटांच्या नावावर बँकेकडून ३२ लाख रुपयांच्या कर्जाची उचल करण्यात आली. असा ३४ लाख ६ हजार रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे.


याप्रकरणी कल्याणी मते यांच्या तक्रारीवरून, दीपिका रामलाल ठाकूर (४५, म्हाडा कॉलनी, भंडारा), नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र भंडाराची व्यवस्थापक ललिता देवीदास कुंभलकर (खात) आणि या केंद्राच्या भंडाराच्या सहयोगिनी बबिता लक्ष्मण देवूळकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२), (५), ३१८ (४), ३३६ (२),(३), ३३८, ३४०(२), ३(५) नुसार गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले आहे.


अधिक महितीनुसार, भंडारा येथील दीपिका रामलाल ठाकूर (४५, म्हाडा कॉलनी) ही महिला गणेशपूर येथे श्रृतिका ब्युटी पार्लर चालविते. या पार्लरमध्ये कल्याणी प्रशांत मते ही महिला नेहमी जायची. त्यामुळे ओळख वाढली. या ओळखीचा फायदा येऊन दीपिका ठाकूर हिने कल्याणी मते व इतर महिलांना विश्वासत घेऊन महिलांचा बचत गट तयार करू, त्यासाठी दरमहा १०० रुपये जमा करायचे सुचविले. भविष्यात सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल, असेही सांगितले. याप्रमाणे दीपिका ठाकूर या महिलेने ६ बचत गट तयार केले.


सहाही बचत गटातील सर्व महिलांना आपल्या ब्युटी पार्लरमध्ये बोलावून महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र भंडाराच्या सहयोगिनी बबिता लक्ष्मण देवूळकर यांच्यामार्फत बैंक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचत गटाचे खाते उघडतो, असे सांगून कोऱ्या फॉर्मवर सह्या घेतल्या. प्रत्यक्षात बँकेत खाते उघडलेच नाही. बचत गटाचे सदस्य होण्यासाठी प्रत्येक महिलेकडून १०० रुपये असे २ लाख ८ हजार रुपये गोळा केले. ते सुद्धा बचत गटाच्या खात्यावर भरलेच नाही. एवढेच नाही तर, सहाही बचत गटांच्या नावावर मोठ्या रकमेचे कर्ज परस्पर उचलले.


असा घडला प्रकार
बँक ऑफ बडोदाकडून या बचत गटांना कर्ज न भरल्याची नोटीस आली. त्यामुळे महिलांनी बँकेत चौकशी केली असता, कर्जाच्या अर्जावर स्वाक्षऱ्या घेऊन दीपिका ठाकूर, बबिता देवूळकर तसेच व्यवस्थापक ललिता देवीदास कुंभलकर यांनी संगणमताने कर्ज उचलण्यासाठी पत्र दिले. त्या पत्रावरून सहा महिला बचत गटांच्या नावाने कर्जाची उचल केल्याचे स्पष्ट झाले. डिसेंबर २०२१ ते जुलै २०२५ च्या दरम्यान हा प्रकार घडल्याची पोलिसात तक्रार आहे.


यांची झाली फसगत
सखी मंच बचत गटाच्या नावे ६ लाख रुपयांचे कर्ज उचलण्यात आले. त्यापैकी ३ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज थकीत झाले. आशा बचत गट : ६ लाखांचे कर्ज उचलून ३ लाख २० हजारांची थकबाकी. कावेरी महिला बचत गट : ६ लाखांचे कर्ज घेऊन ३ लाख ५० हजारांची थकबाकी. नमो बुद्धा महिला बचत गट : ४ लाखांचे कर्ज उचलून २ लाख थकीत, मैत्री बचत गट: ४ लाख ९८ हजार आणि त्याच गटाच्या नावे ५ लाख कर्ज उचलून अनुक्रमे ४ लाख ६८ हजार व २ लाख ७४ हजार रुपये थकीत करण्यात आले.

Web Title: Scam Alert: Signatures were taken on the form, but the account was not opened; 34 lakhs worth of savings group scam with women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.