साकोलीत बोगस कामगार वेलफेअर संघटनांकडून रोहयो मजुरांची लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:39 IST2025-06-13T15:39:02+5:302025-06-13T15:39:52+5:30
Bhandara : रोजगार हमीच्या मजुरांनी प्रलोभनांना बळी पडू नये

Rohyo laborers looted by bogus labor welfare organizations in Sakoli
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : सध्या साकोली तालुक्यात बोगस कामगार वेल्फेअर संघटना उभारून तालुक्यातील गावागावात या संघटनेकडून कमिशन एजंट नेमून विविध सोयीच्या नावाखाली रजिस्ट्रेशन फी नोंदणी फी घेऊन कुठलीही पावती न देता स्थानिक रोजगार हमी मजुरांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असून या लूट मारीत कोण सहभागी आहेत, याबाबत पोलिसांनी चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, भंडाऱ्यातील एका इसमाने रोजगार हमी कामगारांसाठी एक वेल्फेअर संघटना स्थापन केली आहे. साकोली तालुक्यातील प्रत्येक गावात या संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष व गाव अध्यक्ष अशी पदे निर्माण करून दलालामार्फत रोजगार हमी वरील मजुरांना वेगवेगळ्या योजनांचे प्रलोभन देऊन याकरिता नोंदणी फीस आकारली जाते.
२०० ते ५०० रुपये याकरिता घेण्यात येतात. नोंदणी फीस दिल्यानंतर संघटनेच्या वतीने शंभर दिवस रोजगार हमीचे काम निश्चित मिळेल, तसेच बस प्रवाससुद्धा मोफत राहील जीवन विमा मोफत राहील व प्रत्येकाला सातशे रुपये रोजी याप्रमाणे मजुरी देण्यात येईल, असे आश्वासन या बोगस कामगार वेल्फेअर संघटनेच्या स्वयंघोषित पदाधिकाऱ्यामार्फत देण्यात येत आहे.
असाच प्रकार तालुक्यातील लवारी येथे घडल्यानंतर लवारी उमरी येथील सरपंच नरेश नगरीकर यांनी या घटनेची माहिती खंड विकास अधिकारी साकोली यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी गावात दवंडी पिटवून रोजगार हमीच्या मजुरांना सावध केले व कुणीही अशा प्रलोभनांना बळी पडू नये, असे रोहयोच्या कामावरील मजुरांना कळविले.
"मजुरांकडून विषय कळल्यानंतर खंडविकास अधिकारी यांना ही माहिती दिली. असे प्रकार बोगस असून स्थानिक मजुरांनी जागृत राहून प्रलोभनांना बळी पडू नये व पैशाचे व्यवहार करू नये, असे त्यांनी कळविले आहे."
- नरेश नगरीकर, सरपंच