निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रके, भित्तिपत्रकांसह मुद्रणावर आले निर्बंध;
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 13:45 IST2024-10-09T13:43:49+5:302024-10-09T13:45:06+5:30
Bhandara : जिल्हा निवडणूक विभागाची माहिती

Restrictions on printing of leaflets, posters along with the election;
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रके, भित्तीपत्रके आदी मुद्रणांचे संनियंत्रणासाठी भंडारा जिल्ह्यातील सर्व मुद्रणालयांना काही निर्बंध लावण्यात आले आहेत.
निवडणुकीसाठी असणारी पत्रके, छापील साहित्य यावर प्रकाशक आणि मुद्रक यांची नावे असणे आवश्यक आहे. निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नसेल असे कोणतेही मुद्रित प्रकाशित करता येणार नाही. निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक स्वतःच त्याचा प्रकाशक आहे, याबद्दलचे त्याने स्वतः स्वाक्षरी केलेले व त्यावर दोन ओळखणाऱ्या व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन मुद्रकास दिल्याशिवाय मुद्रकाने मुद्रण करू नये.
निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीने कार्यवाही केल्यावर आणि मुद्रकाने मुद्रण केल्यानंतर मुद्रित साहित्याची प्रत जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवावयाची आहे. अन्यथा संबंधित मुद्रणालयाचे लायसन्स रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणारे उमेदवार, राजकीय पक्ष तसेच मुद्रणालय चालकांनी या सूचनांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी आयोगाचे या संबंधित निर्देशांचे अवलोकन करावे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ यांनी कळविले आहे.
तर निर्बंध मोडणाऱ्यांवर होणार कारवाई
निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक याचा अर्थ उमेदवाराच्या प्रचारासाठी वाटण्यात आलेले मुद्रितपत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज, निवडणुकीशी संबंधित असा घोषणा फलक किंवा भित्तीफलक असा आहे. जी व्यक्ती उपरोक्त निर्बंधांचे व्यतिक्रमण करील, ती व्यक्ती सहा महिन्यापर्यंत मुदतीच्या कारावासास किंवा दोन हजार रुपये इतक्या द्रव्यदंडास किवा दोन्ही शिक्षास पात्र असेल.