सुरबोडी गावाचे पुनर्वसन करा, अन्यथा घेऊ जलसमाधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 14:25 IST2024-12-19T14:21:51+5:302024-12-19T14:25:42+5:30
ग्रामस्थ तटस्थ भूमिकेत : महसूल व पोलिस प्रशासन झाले अलर्ट

Rehabilitate Surbodi village, otherwise we will take water burial
विशाल रणदिवे
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : सुरबोडी गावाचे पुनर्वसन गत १३ वर्षांपासून रखडले आहेत. गावाचे पुनवर्सन करा, अन्यथा आम्ही ग्रामस्थ १९ डिसेंबरला जलसमाधी घेऊ, असा ठणठणीत इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांच्या या निर्णयानंतर महसूल व पोलिस प्रशासन अलर्ट झाल्याचेही दिसून येत आहे.
माहितीनुसार, २०११ ते २०२४ पर्यंत या तेरा वर्षांत सुरबोडी या गावाचे पुनवर्सन झाले नाही. पुनवर्सनासाठी ग्रामस्थांनी शासन-प्रशासनाचे अनेकदा दार ठोठावले. लोकप्रतिनिधी यांनाही गावातील समस्यांविषयी लिखित निवेदन दिले. मात्र, एवढे करूनही येथील ग्रामस्थ आपल्याच हक्काच्या घरात, गावात भीतीच्या वातावरणात जगत आहेत.
गावाचे पुनर्वसन होत नसल्याने, गावात राहूनसुद्धा त्रास, भीती नित्यनेमाची होत असल्याने वैतागून गुरुवारी, १९ डिसेंबरला गोसेखुर्द जलाशयात जलसमाधी घेण्याचे ग्रामस्थांनी ठरविले आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, आ. नरेंद्र भोंडेकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा, पुनर्वसन विभाग भंडारा, पोलिस स्टेशन अड्याळ, तहसीलदार आदींना दिले आहे.
विशेष बाब म्हणजे, आता जे काही आंदोलन सुरू होत आहे ते चिघळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. हिंस्त्र प्राण्यांचा हल्ल्यात गावातील अनेक जनावरांचा नाहक जीव गेला. कधी दूषित पाणी पिण्याची वेळ संपूर्ण ग्रामस्थांवर येते आहे. ग्रामस्थांसोबतच आदिवासी समाजातील समाज बांधवांच्या संपूर्ण शेतजमिनी अधिग्रहित झाले. पर्यायी शेतजमीन मिळाली नसल्याने ग्रामस्थांना रोजगारासाठी भटकावे लागत आहे.
गावातील बरीच कुटुंबातील मंडळी उदरनिर्वाह करता गावाच्या बाहेर स्थलांतरित झाली आहेत. गावात वर्ग चौथीपर्यंतचे शिक्षण होत असून, उर्वरित शिक्षणाकरिता गावाच्या बाहेर गेल्याशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय नाही. उपचाराकरिता गावात कुठलीही सुविधा नसून बाहेर गेल्याशिवाय काहीही पर्याय नाही. नवीन सौंदळ, खापरी पुनर्वसनात तलाठी साजा क्रमांक सहा मंडळ चिचाळ नवेगाव पाले येथे ४.१७ हेक्टर आर पडत जमीन शासकीय मालकीची असून, सुरबोडीच्या पुनर्वसनाकरिता वापर करता येऊ शकते, अशीही लेखी माहिती यावेळी ग्रामस्थांनी दिली. गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत सुरबोडी गावठाणाचा खास बाब म्हणून पुनर्वसन करण्यास्तव प्रस्ताव निर्माण होतो. त्याचा उपयोग मात्र आजपावेतो झाला नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी जलसमाधी घेण्याचे ठरविले आहे.
विषारी श्वापदांचा धोका कायम
गावाच्या तीनही बाजूला गोसेखुर्द धरण जलाशय असल्याने विषारी श्वापदांचा धोका कायम आहे. ग्रामस्थांवर हल्ला करून ठार करू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पुरावा देत गावाला पुनर्वसनाची गरज कशामुळे आहे, याचेही लेखी पत्र दिले होते. . त्यात सुरबोडी हे गाव सौंदळ खापरी गट ग्रामपंचायत येथे समाविष्ट आहे. सौंदळ व खापरी या गावाचे पुनर्वसन झालेला आहे. गावातील मुख्य विहिरीला दूषित पाणीपुरवठा होणे. घरांना ओलावा निर्माण होणे. या ओलाव्यामुळे आजपर्यंत अनेकांची घरी कोसळलेली आहेत.