भंडारा जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का घसरला; १.५० लाख हेक्टरचे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 11:18 IST2024-12-03T11:16:18+5:302024-12-03T11:18:31+5:30
Bhandara : आतापर्यंत केवळ १६ हजार हेक्टरमध्ये पेरणी

Rabi sowing percentage declined in Bhandara district; Planning of 1.50 lakh hectares
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामासाठी १.५० लाख हेक्टरमध्ये विविध पिकांची पेरणी करण्याचे नियोजन होते. परंतु, २ डिसेंबरपर्यंत केवळ १६ हजार १३० हेक्टर मध्येच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात उन्हाळी धानाचाही समावेश असतो. परंतु, सध्या धान लागवडीस अवकाश आहे. मात्र, आतापर्यंत भाजीपाला व मसाला पीक वगळता अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य या अंतर्गत सर्वसाधारण क्षेत्राचा विचार करता पीक पेरणी निम्म्यापेक्षाही कमी आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगाम खरीप आटोपल्यानंतर सुरू होते. परंतु, अद्यापही अनेक ठिकाणी शासकीय धान खरेदी सुरू झाले नाही. शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने काहींनी कर्ज काढून उधार, उसने घेऊन रब्बीची तजवीज केली. त्यातच महिनाभर विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. त्यामुळे मजूर मिळेनासे झाले होते. परिणामी रब्बीची पेरणी प्रभावित झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यंदा कृषी विभागाने रब्बी पिकांसाठी १.५० लाख हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन केले होते. तथापि, डिसेंबरच्या २ तारखेपर्यंत जिल्ह्यात फक्त १६१०३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात बागायती गहू २४४८ हेक्टर, मका २८६, ज्वारी २ हेक्टर, अशी अन्नधान्यांची २७३५ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. यंदाही सर्वाधिक हरभरा पिकाची लागवड झाली असून लागवडीचे क्षेत्र ४२५३ हेक्टर इतके आहे. लाख-लाखोरी २८५७ हेक्टर, मूग ९७६, उडीद ९८८, वाटाणा १८२५ पोपट ११८, मसूर २६८, बरबटी ४६, इतर कडधान्य ५ हेक्टर, अशी एकूण ११३०५ हेक्टरमध्ये लागवड झाली.
जवस १२९, मोहरी २२१, सोयाबीन २६६, करडई १४, तीळ २ हेक्टर, असे एकूण गळीत धान्याची ६३२ हेक्टरवर पेरणी झाली. टोमॅटो ८४, मिरची ११४, वांगी १६१, बटाटा ५, कारली २६, भेंडी ८८, कोबी ५१, चवळी ५२, पालेभाज्या ९४, इतर भाज्या ४०, असे मिळून भाजीपाल्याची एकूण ७१५ हेक्टरात लागवड झाली आहे. मसाला पिकांत धने ३५८, कांदा १२, मिरची १२३, असे ४९३ हेक्टर आहे.
मामा तलाव व मध्यम प्रकल्प तुडूंब
यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने तलाव व प्रकल्पात सरासरी ८० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. ३२ लघु प्रकल्पात ७५ टक्के, २८ माजी मालगुजारी तलावात ८० टक्के तर ५ मध्यम प्रकल्पांत ९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पावसामुळे जमिनीत ओलावा असल्याने तुर्तास पाणी सोडण्याची मागणी झालेली नाही. मात्र, उन्हाळी धानासाठी पाण्याची गरज भासते. गरज भासल्यास अनेक शेतकरी विहिरी आणि बोअरिंगच्या माध्यमातूनच सिंचनाची सोय करतात.
तालुकानिहाय लागवड क्षेत्र याप्रमाणे
भंडारा - २४४५ हेक्टर
मोहाडी - १९६९ हेक्टर
तुमसर - ३४८ हेक्टर
पवनी - ४०६२ हेक्टर
साकोली - ८५४ हेक्टर
लाखनी - १०८७ हेक्टर
लाखांदूर - ५३३८ हेक्टर