दिव्यांगांना बसमध्ये आरक्षित आसने द्या ! वाहतूक नियंत्रकाला निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 15:12 IST2025-02-08T15:11:57+5:302025-02-08T15:12:35+5:30

४ आगारांतर्गत येणाऱ्या एसटी बसेसमध्ये सुविधा द्यावी : प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची मागणी

Provide reserved seats in buses for the disabled! Statement to the traffic controller | दिव्यांगांना बसमध्ये आरक्षित आसने द्या ! वाहतूक नियंत्रकाला निवेदन

Provide reserved seats in buses for the disabled! Statement to the traffic controller

लोकमत न्यूज नेटवर्क
किटाडी:
दिव्यांग प्रवाशांना प्रवास अधिक सुखकर व आरामदायी व्हावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने साध्या व शिवनेरी बसमध्ये दिव्यांग प्रवाशांना कायमस्वरूपी चार आरक्षित आसने निश्चित केलेली आहेत. दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन राखीव ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यानंतर त्यांना ते आरक्षित आसन तातडीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची आहे.


दिव्यांगांना प्रवास करताना कोणती अडचण किंवा त्रास होऊ नये, यासाठी त्यांना चढ-उतार करताना प्राधान्य द्यावे तसेच थांबा आल्यावर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक-वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी, असे प्रशासनाने निर्देश दिले आहेत. परंतु, अंमलबजावणी होताना दिसत नाही. परिणामी प्रवासादरम्यान दिव्यांग बांधवांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे आगार महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. 


भंडाऱ्याच्या विभागीय नियंत्रकांना दिले निवेदन
याबाबत अंमलबजावणी व्हावी, अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शाखा, भंडाराच्या वतीने राज्य परिवहन महामंडळ भंडाराच्या विभागाच्या विभागीय वाहतूक नियंत्रक शीतल शिरसाट, विभागीय नियंत्रक तनुजा अहिरकर तसेच व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.


गर्दीमुळे दिव्यांगांना मिळत नाही आरक्षित सीट
सध्या एसटी बसेस हाऊसफुल्ल धावत आहेत. सणासुदीच्या काळात तर एसटीमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. महिलांना अर्धी तिकीट असल्याने प्रवासी संख्या वाढली आहे. अशा गर्दीमुळे दिव्यांगांना आरक्षित असलेली सीट मिळत नाही. बहुतांशवेळा या दिव्यांग प्रवाशांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. अनेक प्रवासी ही बाब समजुनही दिव्यांग बांधवांना सीट उपलब्ध करून देत नाही. हाही एक महत्वाचा मुद्दा ठरत आहे.


यांची होती उपस्थिती
प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा सचिव योगेश्वर घाटबांधे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. उपाध्यक्ष प्रशांत शिवणकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र नेवारे, पिंटू पटले, गिरिधारी मेहर, राधेश्याम मेश्राम, हुमेश्वर हेडाऊ, नितीन बोपचे, संजय चचेडा, रोशन वंजारी उपस्थित होते.
 

Web Title: Provide reserved seats in buses for the disabled! Statement to the traffic controller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.