अनियंत्रित कार झाडावर आदळली; अपघातात वृद्ध ठार, मुलगा व दोन नातू जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2022 17:22 IST2022-06-14T17:20:47+5:302022-06-14T17:22:45+5:30
ट्रकला ओव्हरटेक करताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार झाडावर आदळली.

अनियंत्रित कार झाडावर आदळली; अपघातात वृद्ध ठार, मुलगा व दोन नातू जखमी
साकोली (भंडारा) : भरधाव कार अनियंत्रित होऊन झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात एक वृद्ध ठार तर त्यांचा मुलगा आणि दोन नातू जखमी झाले. हा अपघात सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर विर्शी फाट्याजवळ घडला.
माधव झोडे (७८) रा. शेंदुरवाफा (साकोली) असे मृताचे नाव आहे. तर कार चालक हिवराज माधव झोडे (४२), कुलदीप हिवराज झोडे (१६) वर्ष, प्रियंका हिवराज झोडे (१४) अशी जखमींची नावे आहेत. सोमवारी रात्री सेंदुरवाफा येथील झोडे परिवार मारुती कारने (क्र. एमएच ३६ एजी ८१८) सडकअर्जुनी तालुक्यातील खाडीपार येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. अचानक विर्शी फाट्याजवळील आनंद ढाब्यासमोर ट्रकला ओव्हरटेक करताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार झाडावर आदळली.
यात कारमध्ये बसलेले माधव झोडे यांचा जागीच मृत्यू झाला. कार चालवित असलेला त्यांचा मुलगा हिवराज झोडे, नातू कुलदीप व नात प्रियंका किरकोळ जखमी झाले. जखमींना साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तपास सहायक पोलीस निरीक्षक सेलोकर करीत आहेत.