ना इमारत, ना पशुधन अधिकारी ! चुल्हाडचा पशू दवाखाना गेला कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:10 IST2025-04-23T15:08:50+5:302025-04-23T15:10:01+5:30
राज्यस्तरीय दवाखान्याची दैनावस्था : रिक्त पदांचे ग्रहण सुटता सुटेना, वरिष्ठांचे दुर्लक्ष

No building, no livestock officer! Where did Chulhad's animal hospital go?
रंजित चिंचखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : जनावरांना आरोग्य उपचार, लसीकरण करण्यासाठी पशू दवाखाने मंजूर करण्यात आले आहेत. पशू पालक आणि त्यांच्या पशुधनाची आम्ही किती काळजी घेतो, याचा उदोउदो करण्यात येतो. परंतु, प्रत्यक्षात पशू दवाखाना कागदावरच सुरू असल्याचा प्रकार चुल्हाड गावात दिसून आला आहे. या गावात ना इमारत, ना पशुधन अधिकारी कार्यरत आहेत. राज्य सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या पशू दवाखान्याची वाईट अवस्था झाली आहे.
जिल्हा परिषद क्षेत्र असणाऱ्या चुल्हाड गावात जनावरांचे लसीकरण आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी पशू दवाखाना मंजूर करण्यात आला आहे. शेकडोच्या संख्येत असणाऱ्या जनावरांना औषधोपचार करण्यासाठी चुल्हाड आणि देवरी देव अशी दोन गावे मिळून पशू दवाखान्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मिळणाऱ्या सेवेच्या नावाने बोंबा आहेत.
तालुक्यात हसायचे की रडायचे, अशी स्थिती
राज्य सरकारच्या अखत्यारीत संचालित होणारे पशू दवाखाने ७ आहेत. ६ दवाखान्यात पशुधन अधिकाऱ्याची पदे रिक्त आहेत. हरदोली गावात असणाऱ्या एकमेव दवाखान्यात पशुधन अधिकारी कार्यरत आहेत. गत अनेक वर्षांपासून पशुधन अधिकाऱ्याची पदे रिक्त असल्याने जिल्हा प्रशासनाने अनेक अहवाल दिले असले तरी, रिक्त पदे भरण्यासाठी मुंबईत डरकाळी फोडली जात नाही. रिक्त पदांचा मोठा अनुशेष शिल्लक आहे. यामुळे तालुक्यात हसायचे की रडायचे हेच कळेनासे झाले.
जनावरांच्या लसीकरणाचा प्रश्न ऐरणीवर
ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीत पशू दवाखान्याचा प्रवास सुरू होता. परंतु, पक्की इमारत मिळाली नाही. यानंतर तर उतरती कळाच लागली. जुनी इमारत कोसळल्यानंतर ग्रामपंचायतच्या व्यापारी संकुलच्या खोलीत पशू दवाखान्याचे स्थानांतरण करण्यात आले, परंतु साधे फलक लागले नाही. दोन गावांतील जनावरांचा लसीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पशू पालक आणि जनावरांची किती चिंता प्रशासनाला आहे, हे यावरून दिसते.
पशू दवाखाना बंद होताच खाजगी उपचाराकडे शेतकऱ्यांनी धाव घेतली आहे. जनावरांना खाजगी सेवेतून उपचार मिळायला लागले असले, तरी लसीकरण होत नाही. पशू दवाखानाअंतर्गत राबविण्यात येणारे शिबिर या दोन गावांत पोहचले नाही. चुल्हाड गावात कागदावर असणारा पशू दवाखाना किती कामाचा याचा शोध घेण्याची गरज आहे.
पशुपालक झाले त्रस्त
चुल्हाड येथे पशू दवाखाना असतानाही पशुपालकांना जनावरांच्या उपचारासाठी खासगी सेवा घ्यावी लागत आहे. शासनाच्या या दवाखान्याचा उपयोग तरी काय? असा आपसूकच सवाल पशुपालक विचारीत आहेत. त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
डॉक्टरांचे स्थानांतरण
एकेकाळी या पशू दवाखान्यात सर्व सुविधा होत्या. दिमतीला पशुधन अधिकारी, पट्टी बंधक आणि परिचर होते. पशुधन अधिकारी डॉ. भैसारे यांनी अधिक सेवा दिली. ते अखेरचे पशुधन अधिकारी ठरले. डॉ. भैसारे यांचे पदोन्नतीवर स्थानांतरण झाले.
"चुल्हाड येथील पशू दवाखाना आता कागदावरच आहे. या गावाला जोडणाऱ्या गावातील जनावरांची काळजी सरकारला नाही. दवाखाना नसल्याने लसीकरण, शिबिरांच्माा यध्यमातून पशू पालकांना मार्गदर्शन प्राप्त होत नाहीत. ही समस्या सोडविली पाहिजे."
- चंदा ठाकरे, सरपंच, चुल्हाड.