रात्रीचा वीजपुरवठा जिवासाठी धोक्याचा; रात्री शेतकऱ्यांनी शेतात जाणे केले बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:54 IST2025-02-19T13:51:03+5:302025-02-19T13:54:29+5:30
बिबट्याची गावात दहशत : रानडुकरांचा हैदोस वाढला

Night power supply is life-threatening; farmers stop going to fields at night
मंगेश सेलोकर
लोकमत न्यूज नेटवर्क
धुसाळा : मोहाडी तालुक्यातील आंधळगाव सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटी परिसरातील शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याच्या अभावामुळे गंभीर समस्या भेडसावत आहे. दिवसा वीजपुरवठा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. परंतु, याच वेळी वाघ आणि बिबट्याच्या दहशतीमुळे त्यांचा जीव धोक्यात येत आहे.
काटी, धुसाळा, खैरलांजी परिसरात बिबट व वाघाची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. दहा दिवसांपासून वाघोबा रोज कुठे ना कुठे नागरिकांना दिसत आहे. त्यामुळे रात्री बे रात्री शेतकऱ्यांनी शेतात जाणे सुद्धा बंद केले आहे. वेळेवर पिकाला पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अशा भयावय स्थितीत दिवसा वीजपुरवठा न करता रात्री वीजपुरवठा केला जात आहे.
३ गावांत हिंस्त्र प्राण्यांमुळे दिनचर्येवरही परिणाम
वीज वितरण कंपनीने रात्रीऐवजी दिवसाला वीजपुरवठा केल्यास कायमची समस्या मागर्गी लागू शकते. लोप्रतिनिधींना सांगूनही यावर तोडगा निघालेला नाही.
आठवड्यात चार रात्र आणि तीन दिवस वीजपुरवठा
महावितरणाकडून प्रत्येक हप्त्यात वीजपुरवठा बदलला जातो. सबस्टेशन अंतर्गत चार दिवस रात्री आणि तीन दिवस दिवसा असा वीजपुरवठा सुरू आहे; परंतु सध्या परिसरात वाघ आणि रानडुकरांचा चांगलाच हैदोस असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे कठीण झाले आहे. वारंवार सांगुनही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कानाडोळा केजात आहे. महावितरणाने रात्रीचा वीजपुरवठा बंद करून सकाळी वीजपुरवठा दिल्यास शेतकरी सहजपणे पिकांना पाणी देऊ शकतात.
कोण जाणार मध्यरात्री !
जर का सायंकाळी ६ वाजेची लाइट असली की शेतकरी सहज शेतात जाऊन वीजपुरवठा सुरू करू शकतात; पण रात्री लाइट असली की मध्यरात्री १२ वाजता शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. या अगोदर असे किती तरी आकस्मिक प्रकार घडले आहेत. त्यामुळे पीक वाचवावे की जीव? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर ठाकला आहे.
विषारी श्वापदांचीही भीती
रात्रीच्या वेळी वीजपुरवठा मिळत असल्याने शेतकऱ्यांना अंधारात आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. यादरम्यान साप, विंचू यासह अनेक विषारी प्राण्यांची दहशत असताना सुद्धा जिवाची बाजी लावून पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
"गावाशेजारी वाघाची चांगलीच दहशत माजली आहे. शेतकरी दिवसा सुद्धा शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. मग रात्री वीजपुरवठा सुरू करण्यासाठी शेतकरी शेतात जाईल तरी कसा? रानडुक्कर तसेच बाकीचे हिंसक प्राणी यांच्यापासूनही जिवाला धोका आहे."
- रोशन बुधे, शेतकरी काटी.