नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे धमकावून नवविवाहितेचा हुंड्यासाठी केला छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 11:53 IST2025-05-30T11:53:11+5:302025-05-30T11:53:55+5:30

Bhandara : नागपुरातील डेकाटे परिवाराविरोधात गुन्हे दाखल

Newlyweds tortured for dowry, threatening them with links to Naxalites | नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे धमकावून नवविवाहितेचा हुंड्यासाठी केला छळ

Newlyweds tortured for dowry, threatening them with links to Naxalites

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच हुंड्यासाठी सुनेचा व तिच्या माहेरच्यांचा छळ करणाऱ्या नागपूर येथील डेकाटे परिवाराविरोधात भंडारा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात पती अभिषेक उर्फ घृनेश्वर राजेंद्र डेकाटे, सासरे राजेंद्र डेकाटे, सासू माधुरी डेकाटे व नणंद नंदिनी डेकाटे यांचा समावेश आहे.


भंडारा येथील प्रतिक तांबोळी यांची मानसकन्या असलेल्या वैभवीचा विवाह शांतीनगर मुदलियार ले-आऊट नागपूर येथील अभिषेक उर्फ घृनेश्वर डेकाटे याच्यासोबत १९ जानेवारीला झाला होता. मुलगा कमावता असून ७ ते १० लाख रुपयांची वार्षिक उत्पन्न असल्याचे लग्नापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, अभिषेक कसलाही कामधंदा करीत नसून पूर्णतः आईवाडिलांवर अवलंबून व व्यसनाधीन असल्याचे लग्नानंतर लक्षात आले. फसवणुकीबद्दल वैभवीने सासरच्यांना विचारले असता तीचा छळ सुरू केला. माहेरून रुपये आणायला सांगितले.


एवढेच नाही तर, मुलीचा पती आणि सासऱ्याने प्रतिक तांबोळी यांना प्रत्यक्ष भेटून पाच लाखाची मागणी केली. आमचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत. रक्कम न दिल्यास व पोलिसात तक्रार केल्यास मुलीचे बरेवाईट झाले तर तुम्ही जबाबदार राहाल, अशीही धमकी दिली. यानंतर सासू व ननंदेने वैभवीचे सोन्याचे दागिने हिसकावून वडीलांकडून ५ लाख रुपये आण असे सांगून २० मार्चला माहेरी परत पाठवून दिले. 


सासरच्या मंडळींचा तडजोडीस नकार

  • या नंतरही मुलाच्या मामाने तडजोडीसाठी तांबोळी परिवाराला १ एप्रिलला नागपुरात बोलविले.
  • मात्र काहीही न ऐकता सासरच्यांनी अर्वाच्य भाषा वापरत पैसे असेल तर मुलीला ठेवा अन्यथा घेऊन जा, असे बजावले.
  • यानंतर तांबोळी यांनी भंडारा पोलिसामध्ये ३ एप्रिल अर्ज करून भरोसा सेल येथे तडजोडीचा प्रयत्न केला. परंतु वैभवीचे सासरच्या लोकांनी तडजोडीत नकारात्मक भूमिका घेतली. अखेर प्रतिक तांबोळी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असता भान्यासंच्या कलम ८५, ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करून चौकशी सुरू झाली आहे.

Web Title: Newlyweds tortured for dowry, threatening them with links to Naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.