फळशेतीचा नवा ट्रेंड: शेतकरी कमावतायत लाखोंचा नफा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:07 IST2025-04-29T15:07:13+5:302025-04-29T15:07:50+5:30
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : फळशेतीकडे वळा, कृषी विभागाचे आवाहन

New trend in fruit farming: Farmers are earning profits worth lakhs!
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात सर्वाधिक ८१ हजार हेक्टरवर धानाची शेती होते. परंतु, दरवर्षीच्या नापिकीमुळे आता शेतकरी फळबागांकडे वळत आहेत. शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याने यंदा २५२.३० हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे. गत ८ ते १० वर्षापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात फळबागांची लागवड केली, त्या शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळत आहे. आंब्यासह चिकू, पेरू, अॅपलबोर, लिंबू यासारखी पिके घेऊन ते शेतकरी मालामाल झाले आहेत.
जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची साधने आहेत, असेच शेतकरी रब्बी हंगामात मका, भाजीपाला, धान ही पिके घेतात. परंतु, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमुळे जिल्ह्याचे चित्र पालटत आहे. जिल्ह्यातील धान उत्पादन शेतकरी आता अन्य पिकांकडे तसेच फळबाग लागवडीकडे वळत आहे. शेतात एकच पीक न घेता वर्षभर उत्पादन देणारे पीक घ्यावे, असा कल जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दिसून येत आहे.
२५२ हेक्टर क्षेत्रावर यंदा वर्षी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये संत्रा, आवळा, केळी, अॅपल बोर, पेरू, आंबा, पपीता, चिकू, टरबूज, लिंबू ड्रॅगन फुट आदी फळांचा समावेश आहे.
पारंपरिक पीकपद्धती खर्चिकः शाश्वती नाही
पारंपरिक पीक पद्धतीतून शेतकऱ्यांना अल्प नफा मिळतो, तसेच भरघोस पीक उत्पादनाबाबत अनिश्चितता असते. त्यामुळे शेतकरी फळबाग लागवडीकडे वळत आहेत.
आवळा, संत्रा, केळीचे क्षेत्रात होतेय वाढ
शेतकऱ्यांना फळशेती फायदेशीर ठरत असल्याने अनेक शेतकरी फळझाडांची लागवडीकडे वळले आहेत. सन २०२४-२५ या वर्षात जिल्ह्यात ९.८० हक्टरवर संत्रा, १०.२० हेक्टरवर आवळा, ४ हेक्टरवर केळी, १४ हेक्टरवर अॅपल बोर तर २२.३० हेक्टरवर पेरू पिकाची लागवड झाली आहे. चालू वर्षात यात आणखी भर पडण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यात आंबा लागवडीचे क्षेत्र सर्वांत जास्त
जिल्ह्यात यंदा आंबा लागवडीचे क्षेत्र सर्वात जास्त म्हणजे १२० हेक्टर आहे. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी शेतात २ हेक्टरवर पपीता, ६० हेक्टरवर टरबूज, ४ हेक्टरवर लिंबू तर ५ हेक्टरवर चिकू फळबागांची लागवड केलेली आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. तेव्हाच अधिकाधिक लागवड होऊ शकते. शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावर मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात ड्रॅगन फ्रुट लागवडीचा नवा प्रयोग
भंडारा जिल्ह्यात ड्रॅगन फ्रूट लागवडीचा प्रयोग दोन वर्षांपूर्वी करण्यात आला होता. तो यशस्वी झाला. त्यामुळे पुन्हा यंदा १ हेक्टर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुट फळबागेची लागवड करण्यात आली. कोका येथील गुड्डू हातझाडे यांनी या फळबाग लागवडीचा वसा घेतला आहे. परंतु, या फळाची रोपटी परजिल्ह्यातून बोलवावी लागत असल्याने सध्या हा प्रयोग कमी प्रमाणात होत आहे.
सिंचनसुविधा वाढली, अनुदानाचाही लाभ
ज्या शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये सिंचन विहिरी व कूपनलिकेच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. त्या शेतकऱ्यांनी आता नव्या प्रयोगांकडे लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. याशिवाय फळबाग लागवडीसाठी शासनाकडून अनुदानही मिळत असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने लाभ घेण्यासाठी तयारी दर्शवित आहेत.