साकोलीतील लग्न सोहळ्यात जेवणामुळे शंभराहून अधिक वऱ्हाडींना विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:06 IST2025-06-10T13:05:57+5:302025-06-10T13:06:53+5:30
Bhandara : लग्न समारंभातील जेवणातून अनेकांना झाली विषबाधा

More than 100 people get food poisoning at a wedding in Sakoli
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली (भंडारा) : चार दिवसांपूर्वी साकोली येथील एका सभागृहात आयोजित लग्न समारंभाच्या जेवणातून शंभराहून अधिक वऱ्हाडींना विषबाधा झाली. यातील सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत शिबिर लावण्यात आले आहे.
चार दिवसांपूर्वी माजी सभापती मदन रामटेके यांच्या मुलीचा विवाह सोहळा साकोली येथील एका मंगल कार्यालयात पार पडला. या विवाह सोहळ्यात जेवणातून विषबाधा होऊन जवळपास शंभरावर वन्हाडींना विषबाधा झाली. लग्न सोहळ्यानंतर जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. या जेवणातून अनेकांना विषबाधा झाली. लग्न सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी अनेकांना हगवण आणि उलटीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले. अनेकांवर उपचार सुरू आहेत. जवळील जांभळी येथे रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे आरोग्य विभागामार्फत शिबिर लावून तिथे उपचार सुरू आहेत. दरम्यान दोन ते तीन दिवसांपासून दवाखान्यात भरती असल्याचेही सांगण्यात आले.