लाखांदूर तालुक्यात १,८०४ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 18:11 IST2025-07-14T18:10:02+5:302025-07-14T18:11:24+5:30
Bhandara : जवळपास २५ टक्के क्षेत्रात झाली होती लागवड

Kharif crops damaged in 1,804 hectares of area in Lakhandur taluka
दयाल भोवते
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : मागील ७ ते ९ जुलैच्या सुमारास तालुक्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने तालुक्यातील वैनगंगा व चुलबंद नदीसह जुडलेल्या विविध नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. या पुराचे पाणी शेतशिवारात लागवडीखालील विविध खरीप पिकांमध्ये गेल्याने पिकांचे नुकसान झाले.
लाखांदूर तालुक्यातील प्रशासनाअंतर्गत तालुक्यातील जवळपास १ हजार ८०४ हेक्टर क्षेत्रातील विविध खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तालुक्यात खरीप हंगामाच्या सुमारास पावसाच्या पाण्यासह इटियाडोह धरणाअंतर्गत व कृषी वीज पंप सिंचन सुविधेअंतर्गत पिकांना सिंचन सुविधा उपलब्ध केली जाते. पावसाळ्याच्या दोन नक्षत्रांत पर्याप्त पाऊस न झाल्याने तालुक्यात इटियाडोह धरण लाभक्षेत्रासह चौरास भागातील शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन सुविधेअंतर्गत मोठ्या प्रमाणात धान पह्यांची लागवड केली होती. या लागवडीअंतर्गत मागील काही दिवसांमध्ये चौरासातील बहुतांश भागात धान लागवडीला सुरुवात झाली होती. त्यानुसार चौरास भागातील जवळपास २५ टक्के क्षेत्रात खरिपातील धानाची लागवड पूर्ण झाली होती. तर उर्वरित क्षेत्रात धान रोवणी सुरू व धान पन्हे शेतात होते.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील चुलबंद नदीसह नदीला जोडलेल्या सर्वच नाल्यांना पूर आला. या पुरामुळे धान पन्ह्यांसह लागवडीखालील धान पिकांचे नुकसान झाले.
तालुक्यातील आकडेवारी काय म्हणते ?
लाखांदूर तालुका प्रशासनाअंतर्गत तालुक्यात जवळपास १ हजार ८०४ हेक्टर क्षेत्रातील विविध खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. या अंदाजानुसार तालुक्यातील तब्बल ४८ गावांमधील जवळपास ५ हजार ४१२ शेतकऱ्यांच्या विविध खरीप पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, बहुतांश भागातील शेतशिवारात लागवडीखालील धान पन्हे अतिवृष्टी व पुरामुळे सडले आहेत. बळीराजाला आता मदतीची अपेक्षा आहे.