वीज बिलाच्या नावाखाली न्यायाधीशांची ३ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 12:00 IST2022-10-19T11:56:39+5:302022-10-19T12:00:49+5:30
भामट्याने ऑनलाइन ३ लाख हडपले

वीज बिलाच्या नावाखाली न्यायाधीशांची ३ लाखांची फसवणूक
भंडारा : वीज बिल भरण्याच्या नावाखाली येथील न्यायाधीशांना एका भामट्याने तीन लाख रुपयाने ऑनलाइन फसविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी भंडारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील न्यायाधीश चारुदत्त लक्ष्मीकांत देशपांडे यांच्या मोबाईलवर एक मॅसेज आला. त्यात वीज बिल थकीत असून तत्काळ न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असे म्हटले. यावरून न्या. देशपांडे यांनी संबंधित नंबरवर फोन केला. तेव्हा क्विक सपोर्ट हे ॲप इन्स्टाॅल करण्यास सांगून त्यावर आलेली लिंक शेअर करून ११ रुपये पाठविण्यास सांगितले.
न्या. देशपांडे यांनी ११ रुपये नेट बँकिंगद्वारे जमा केले असता त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यातून पहिल्यांदा ९९ हजार ९९० रुपये, दुसऱ्यांदा पुन्हा तेवढेच आणि तिसऱ्यांदा ९९ हजार ९९८ रुपये असे एकूण २ लाख ९९ हजार ९७८ रुपये एका क्रेडिट कार्डद्वारे ट्रान्सफर झाल्याचे लक्षात आले. हा प्रकार लक्षात येताच न्या. देशपांडे यांनी भंडारा ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.