तुरीच्या शेंगा, पोखरणाऱ्या अळीला कसे रोखाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 12:47 IST2024-12-14T12:45:33+5:302024-12-14T12:47:34+5:30
थंड हवामान पोषक अन् घातक : योग्य व्यवस्थापनाचा कृषी विभागाचा सल्ला

How do you stop the caterpillars from burrowing into the pods of a turi?
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात सध्या खरीप हंगामात लागवड झालेले तुरीचे पीक फुलोऱ्यावर आहे. काही ठिकाणी शेंगा लागण्यास सुरुवातही झालेली आहे; पण याच आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्यापासून पारा ९ अंशापर्यंत उतरला.
त्यामुळे रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक ठरत आहे. तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांपासून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करून अळीला रोखावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंड्यांमधून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि. मी. लांब, विविध रंग छटेत दिसून येतात.
यामध्ये पोपटी, फिक्कट गुलाबी व करड्या रंगाच्या अळ्या असून, तिच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगांतील दाणे पोखरून खातात. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येत असते. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. गतवर्षी अवकाळी पाऊस तसेच कीड व रोगामुळे तूर पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही अळीमुळे धोका संभवत आहे.
शेंगा पोखरणाऱ्या अळी आक्रमण
अळी लहान असताना पानांवर, तर पीक फुलोऱ्यावर असताना कळ्या, फुले आणि शेंगांवर आक्रमण करते. अळी शेंगांवर विविध आकाराचे छिद्र पाडते. फुले आणि कोवळ्या शेंगांना आतून खाल्ल्याने नुकसान होते आणि फुलेही गळतात.
कीटकनाशके फवारूनही उपयोग होईना
शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे तूर पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. हे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
अळीला कसे रोखाल?
पहिल्या फवारणीत पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझेंडेंरेक्टीन ५० मिलि प्रति १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. जास्त प्रादुर्भाव असेल तर १५०० पीपीएम अझेंडरेक्टीन २५ मिलि प्रति १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
जिल्ह्यात ११,४०० हेक्टर्सवर तूर
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुऱ्यांवर तसेच सलग व सोयाबीन पिकात तुरीची लागवड करण्यात येते. ■ यावर्षी ११ हजार ४०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात आली आहे.