"गॅस, भांडे, भूत... काहीच नाही!" ; अंनिसच्या भेटीनंतर उघड झाला ‘रहस्य’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:55 IST2025-07-24T15:55:22+5:302025-07-24T15:55:58+5:30
Bhandara : बिनाखीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली जनजागृती

"Gas, pot, ghost... nothing!"; 'Mystery' revealed after ANS' visit
चुल्हाड (सिहोरा): बिनाखी येथील कैलास गौतम यांचे घरी गेल्या आठ दिवसांपासून होणाऱ्या रहस्यमय प्रकारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे जनजागृती नंतर आळा बसला आहे. सोमवारी (दि २१) ला सायंकाळी ७ वाजता पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. तब्बल दोन तास घरात पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडल्यानंतर ना गॅस सुरु झाली. ना भांडे पडल्याचा अनुभव आला आहे. भानामती व जादूटोणा असे कुठलेही प्रकार नसल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष किशोर बोदरे यांनी सांगितले.
बिनाखी गावांत वास्तव्यास असलेले कैलास गौतम यांच्या खोलीत गेल्या आठ दिवसापासून रहस्यमय प्रकार सुरु होते. घरातील भांडे पडणे, अचानक गॅस सुरु होणे, साहित्य जळणे, मोबाईल गायब होणे असे प्रकार सुरु असताना गौतम कुटुंबीय दहशतमध्ये आले होते. भूत, जादूटोणा तथा अन्य प्रकारची भीती कुटुंबियांत सुरु झाली होती. यासंदर्भात तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीला माहिती देण्यात आली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका संघटक राहुल डोंगरे, तालुकाध्यक्ष किशोर बोदरे, उपाध्यक्ष विजय केवट, सतीश पटले आणि पोलीस निरीक्षक विजय कशोधन यांनी सोमवारी (दि २१) सायंकाळी ७ वाजता कैलास गौतम यांच्या घरी भेट दिली. घरात तब्बल दोन तास थांबले. या कालावधीत अचानक गॅस सुरु झाली नाही. घरातील भांडे पडले नाहीत.
साहित्य अचानक गायब झाले नाही. जादूटोणा, भूत बाधा, भानामती असे कुठलेही प्रकार नाहीत. हा अंधश्रद्धाचा प्रकार आहे. गौतम कुटुंबियांत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जनजागृती केली आहे. यानंतर तीन दिवसापासून असा कुठलाही प्रकार कैलास गौतम यांचे खोलीत घडून आलेला नाही.
गावकऱ्यांची घटनास्थळी गर्दी
या रहस्यमय प्रकाराचा उलगडा करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आणि पोलीस विभाग आले असल्याचे कळताच गावकऱ्यांची उत्सुकता वाढली होती. शेजारी असलेल्या गावातील नागरीक गोळा झाले होते. राष्ट्रीय महामार्गावरही नागरिकांची गर्दी झाली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली.
"कैलास गौतम यांच्या घरी आम्ही पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. स्थितीचा आढावा घेतला. दोन तास थांबल्यानंतर असा कुठलाही प्रकार घडला नाही. कुटुंबियांत जनजागृती करण्यात आली. भानामती, जादूटोणा, भूत असे कुठलेही प्रकार नाहीत. अशा चर्चावर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये."
- राहुल डोंगरे, तालुका संघटक, अंनिस