'व्हाईस ऑफ दर्पण' या महिला योजनेच्या नावाखाली ८० लाखांची फसवणूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:00 IST2025-06-16T16:00:16+5:302025-06-16T16:00:39+5:30

पीडित महिलांची पत्रपरिषद : मुख्यमंत्र्यांनी दिले पारडी पोलिसांना चौकशीपत्र

Fraud of 80 lakhs in the name of 'Voice of Darpan' women's scheme! | 'व्हाईस ऑफ दर्पण' या महिला योजनेच्या नावाखाली ८० लाखांची फसवणूक!

Fraud of 80 lakhs in the name of 'Voice of Darpan' women's scheme!

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली :
नुकत्याच पिंडकेपारवरून गाजलेल्या 'पे टू पे' या फसवणूक प्रकरणानंतर आता पुन्हा 'व्हाईस ऑफ दर्पण' या महिला योजनेच्या नावाखाली अनेक महिलांची लाखो रुपयांनी आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. महिलांकडून पैसे गोळा करून मुख्य कार्यालय गुजरातला पाठविले. परंतु, एक वर्ष लोटूनही काहीच फायदा नाही हे बघून आता महिला तक्रारीसाठी पुढे आल्या आहेत. पत्रकार परिषदेतून या फसवणकीच्या प्रकाराची आपबिती मांडत चौकशीची मागणी केली आहे.


देश का सबसे बड़ा आर्थिक सर्व्हे व्हाईस ऑफ योजना दर्पण प्रेस' अशी सोशल मीडियात गुजरातमधून ऑनलाइन माहिती आली होती. यात महिलांना अनुदान ५० हजार देण्याचे प्रलोभन दाखविले गेले. नेमलेल्या एजंटांकडून महिलांकडून प्रत्येकी २०० रुपये जमा करून ही रक्कम गुजरातला क्लिअर व्हिजन फाउंडेशन नं. ५०२०००७९४७३५०१ या एचडीएफसी बँक खात्यात पाठविली.


एकट्या साकोली तालुक्यातील ४० हजार महिलांनी या योजनेत फॉर्म भरले आहेत. त्यानुसार, येथून ८० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. अन्य ठिकाणीही अशाच प्रकारातून रक्कम गोळा होण्याची शक्यता नाकारली जात नाही. दीड ते दोन वर्षे लोटूनही आपल्याला काहीच अनुदान मिळाले नसल्याने या महिलांनी महिला स्थानिक एजंटांच्या घरी जाऊन संपर्क साधला. मात्र, काहीच थांगपत्ता लागत नसल्याने त्यांनी अखेर शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली कैफियत मांडली. यात निशा युवराज उदापुरे (खजरी/डोंगरगाव, ता. सडक अर्जुनी), भाग्यश्री नेपाल (रेंगेपार/दल्ली, जि. गोंदिया) व योगिता हंसराज रामटेके (सावरबंध, ता. साकोली) यांचा समावेश होता.


आपल्यासारख्या फसविल्या गेलेल्या अनेक महिला आहेत. लाडक्या बहिणींना याच योजनेतून पैसे दिले जातात, असे आम्हाला सांगून फॉर्म भरून घेण्यात आले होते, असे या महिलांनी सांगितले. आमच्या संपर्कातील इतर महिलांनाही असेच सांगण्यासाठी आम्हाला सांगण्यात आले होते, अशीही माहिती त्यांनी दिली.


आता लक्ष पोलिसांच्या कारवाईकडे
याप्रकरणी या व्हाईस ऑफ दर्पण ब्युरो चीफ असलेल्या नागपूरच्या एका व्यक्तीने याबाबत मुख्यमंत्री फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पोलिस आयुक्तांकडे तक्रारपत्र दाखल केले होते. या पत्राची दखल घेणारे पत्र मुख्यमंत्र्यांकडून नागपूर पोलिसांना पोहोचले आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.


फसवणुकीचे धागेदोरे परप्रांतात
या फसवणूक प्रकरणातील धागेदोरे परप्रांतात असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. गुजरातमधील संबंधित कंपनीच्या व्यक्तींनी आपल्या हस्तकांमार्फत स्थानिक परिसरातील महिलांना एजंट बनविले. त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील महिलांकडे घरोघरी पाठवून फार्मसह २०० रुपये भरुन घेतले. याप्रकरणाची खोलवर चौकशी केली तर मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांची यात फसवणूक झाल्याने सखोल चौकशीची मागणी होत आहे.


 

Web Title: Fraud of 80 lakhs in the name of 'Voice of Darpan' women's scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.