अंगणवाडी भरती प्रक्रियेत घोळ; विरोधकांचे धरणे आंदोलन
By युवराज गोमास | Updated: March 25, 2025 17:54 IST2025-03-25T17:51:47+5:302025-03-25T17:54:14+5:30
विरोधी पक्ष गटनेत्याने केले नेतृत्व : डेप्युटी सीईओंचे चौकशीचे आदेश

Fraud in Anganwadi recruitment process; Opposition stages sit-in protest
युवराज गोमासे
भंडारा : तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका-मदतनिस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. खापा (आजीमाबाद) व सुरेवाडा येथील भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आक्षेप घेत जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष गटनेते विनोद बांते यांच्या नेतृत्वात मंगळवारला (२५ मार्च) १२.३० वाजताच्या सुमारास धरणे आंदोलन करण्यात आले. प्रकरणी जि. प. उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांच्या कक्षात उपमुख्य कार्यपालन अधिकारी जयप्रकाश परब यांच्या समक्ष संबंधित अधिकारी व आक्षेपकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर डेप्युटी सीईओ परब यांनी चौकशीचे आदेश दिले.भंडारा तालुक्यातील गट ग्रामपंचायत खापा (आजीमाबाद) येथील अंगणवाडी-मदतनिस पदासाठी सुषमा जगदिश मेश्राम तसेच आजीमाबाद येथील अंकीता अष्टदीप गजभिये, मंगला अजय भुरे व शालू विष्णू मेश्राम यांनी अर्ज सादर केले होते. सुषमा मेश्राम यांनी अर्जासोबत १२ वीची गुणपत्रिका जोडली होती. तरीसुद्धा त्यांना प्रथम प्रसिद्ध यादीमध्ये अपात्र करण्यात आले. सुरेवाडा येथील भरती प्रक्रियेत भूमेश्वरी टांगले यांना सर्व कागदपत्रे जोडली असताना एका गुणाने बाद करण्यात आल्याचा विरोध व न्यायाची मागणी धरणे आंदोलनातून करण्यात आली.
धरणे आंदोलनात विनोद बांते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विवेक नखाते, भंडारा पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत खोब्रागडे, महेश खराबे, शेखर खराबे, सुरेवाडा येथील भूमेश्वरी टांगले, खापा येथील सुषमा मेश्राम आदींचा सहभाग होता. आरोपांसंबंधी प्रभारी सिडीपीओ छाया ढोरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
डेप्युटी सीईओंनी ऐकून घेतल्या दोन्ही बाजू
जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन सुरू होताच एकच धावपळ झाली. जि. प. उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी जयप्रकाश परब, प्रभारी तालुका महिला बालविकास अधिकारी छाया ढोरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय झाेले आदींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. उपाध्यक्ष फेंडर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत अधिकारी व पदाधिकाऱ्यांसमक्ष आंदोलनकर्ते व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेण्यात आली. तसेच भरती संबंधीच्या व गुणदानासंबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांचे प्रमुख आक्षेप
भरती होत असलेल्या गावातील महिलांना अपात्र ठरवित दुसऱ्या गावातील महिलांना पात्र ठरविण्यात आले. शासनमान्य मॉटेसरी सर्टीफिकेटला अमान्य ठरवित गुण देण्यात आलेले नाहीत. दीड लाखाची मागणी करण्यात आलेल्या विधवा महिलेने पैसे दिले नाही म्हणून एका गुणाने अपात्र ठरविण्यात आले. जाणीवपूर्वक घोळ केलेल्यांचा भरती प्रक्रियेसंबंधाचा पदभार तत्काळ काढण्यात यावा, प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
"खापा (आजीमाबाद) व सुरेवाडा येथील अंगणवाडी भरतीत घोळ करण्यात आला. त्यामुळे यापूर्वी निलंबीत झालेल्या पर्यवेक्षकाकडे सीडीपीओंचा दिलेला प्रभार काढण्यात यावा. प्रकरणी चौकशी न झाल्यास जिल्हाधिकारी तसेच आयुक्तांकडे दाद मागितली जाईल."
- विनोद बांते, विरोधी पक्ष गटनेता, जि. प., भंडारा.