आधी वाघ सोडले, आता हरणांना सोडणार, आदिवासींना जंगलातून हद्दपार करणार का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:01 IST2026-04-09T14:52:55+5:302026-04-09T15:01:44+5:30
Bhandara : चंद्रपुरातील ताडोबातून चार वाघिणी सोडल्याने नागझिऱ्यात वाघांची संख्या सुमारे १७-१८ झाली आहे. गेल्या २२ दिवसांत वाघांनी तीन जणांवर हल्ले केले.

First they released the tigers, now they will release the deers, will they expel the tribals from the forests?
गोविंद हटवार
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली (भंडारा) : चंद्रपुरातील ताडोबातून चार वाघिणी सोडल्याने नागझिऱ्यात वाघांची संख्या सुमारे १७-१८ झाली आहे. गेल्या २२ दिवसांत वाघांनी तीन जणांवर हल्ले केले. यात दोघांचा जीव गेला. एक महिला जखमी आहे. आता ५०० हरणांना सोडण्यात येणार असल्याचे व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी ६२ पत्रकारांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात सांगितले. आधी वाघ सोडले, आता हरणांना सोडणार. नंतर आदिवासींना जंगलातून हद्दपार करणार का?, असा प्रश्न स्थानिक विचारू लागले आहेत.
शेतात ऊस लावल्यास रानडुकरे उसाची नासाडी करतात. चण्यावरही ते ताव मारतात. आंबे, पेरू, बोरं, टरबूजं, शेवगा, तुरी खाण्यासाठी माकडे सदैव तत्पर असतात. हरणी गहू खाण्यासाठी शेतात येतात. हरणांना खाण्यासाठी वाघही शेतशिवारात फिरकतात. शेतातील पिकांमध्ये वातावरणात गारवा असल्याने उन्हाळ्यात बिबट्याही बस्तान मांडतो. बिबटे गावातील कुत्रे, बकरे, कोंबड्यांना फस्त करतात. अशाप्रकारे वन्यप्राणी जंगल सोडून शेती, पशुधनाचे प्रचंड नुकसान करतात. यावर उपाय म्हणून प्रकल्पाच्या सीमेवर सौलरवरील झटका मशीन काही ठिकाणी लावण्यात आल्या. पण, त्याचा वन्यप्राण्यांवर काही परिणाम झाला नाही. पिटेझरी येथे किरण पुरंदरे यांच्या प्रयत्नाने एनजीओच्या माध्यमातून लोखंडी जाळीचे कुंपण करण्यात आले. त्यामुळे शेती, पशुधनाचे नुकसान कमी झाले. पिटेझरीत स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारही मिळाला. पण, इतर गावांमध्ये वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान सुरूच आहे.
हरणांना सोडल्यास त्या जंगलालगतच्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ५०० शेतात येतील. शेतकऱ्यांचे नुकसान करतील, अशी परिस्थिती आहे. या हरणांना खाण्यासाठी ग्रासलँड (कुरण) व्याघ्र प्रकल्पात विकसित झाले नाही. त्यामुळे जंगलात हरणांना आवश्यक असलेले गवत मिळणार नाही. मग त्या सागवान खावून जगणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वन्यप्राण्यांसाठी शेतकऱ्यांना रात्रीही शेतावर जागली करावी लागते. कोअर झोनलगतच्या शेतात तारेचे कुंपण करणे सोडून एवढ्या मोठ्या प्रमाणात हरणांना सोडण्याचा प्रस्ताव म्हणजे मूर्खपणा असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, खाद्य, अखाद्यच्या नावाखाली दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. पण, त्याचा प्राण्यांसाठी काही फायदा होताना दिसत नाही.
१०६ ईडीसींचे सक्षमीकरण व्हावे
व्याघ्र प्रकल्प परिसरात १०६ गावांत ग्राम परिस्थितीकी विकास समिती (ईडीसी) स्थापन करून गावाच्या विकासावर निधी खर्च करण्यात आला. गावांचा सुक्ष्म आराखडा तयार करण्यात आला. पण, त्या आराखड्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही. ईडीसी आणि वनहक्क समित्यांना बळ देऊन त्यांचे सक्षमीकरण करून स्थानिकांना रोजगाराची साधने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
किरण पुरंदरेंचा आदर्श
किरण पुरंदरे हे मूळचे पुण्याचे. ते नागझिऱ्यात आले नि त्याच्या प्रेमात पडले. आता त्यांनी पिटेझरीत महिलांसाठी शिलाई मशीनच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला. पर्यावरणविषयक जागृती या परिसरात ते करत आहेत. जंगलात पशुपक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्यापासून, तर फळांची रोपे भेट देण्यापर्यंत एकटा व्यक्ती हे सारं करू शकतो. पिटेझरी गावातील शेतीच्या संरक्षणासाठी प्रयत्न करू शकतो. मग, लाखो रुपये पगार घेणारे हत्तीएवढे बळ असलेले वनकर्मचारी असे काहीच का करू शकत नाही. राजकीय नेतृत्व कुठे कमी पडते? हे न उलगडणारे कोडे आहे.
लोखंडी जाळ्यांच्या कुंपणाचा प्रस्ताव
गावाच्या शेतीभोवती लोखंडी जाळीचा कुंपणाचा प्रस्ताव वनविभाग भंडारा यांच्याकडे सादर करण्यात येईल. गावकऱ्यांच्या चर्चेनुसार नव्याने होत असलेल्या बफर क्षेत्रास गावकऱ्यांचा विरोध होत असून, यावर चर्चा करण्यासाठी तत्काळ सभा घेऊन गावकऱ्यांचे समाधान करण्यात येईल, असे लेखी आश्वासन व्याघ्र प्रकल्पाच्या सहायक वनसंरक्षक यांनी शिवणटोला येथील गेटसमोर आंदोलकांना लिहून दिले. पण, यासाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार, हे येणारा काळच सांगेल. गावकऱ्यांची सहमती असल्याशिवाय, तसेच ग्रामपंचायतीचा ठराव आणल्याशिवाय भविष्यात कोणताही प्रस्ताव शासनस्तरावर मंजुरीकरिता सादर करण्यात येणार नाही. शिवणटोला येथून होणारी जडवाहतुकीला तात्पुरती परवानगी देण्यात येत आहे, असेही वन विभागाच्या प्रतिनिधीने लेखी दिले.