अखेर रेल्वेची माघार ! खासदारांनी डीआरएम व जनरल मॅनेजरशी केली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:23 IST2025-02-11T13:22:45+5:302025-02-11T13:23:27+5:30
Bhandara : जनआंदोलनापुढे प्रशासन नमले; मधुकर कुकडे यांच्या नेतृत्वात झाले आंदोलन

Finally Railways backs down! MPs hold talks with DRM and General Manager
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मुंबई-हावडा मार्गावरील ५३२ रेल्वे क्रॉसिंगवरील फाटक बंद करण्याकरिता रेल्वे प्रशासन सोमवारी अधिकाऱ्यांसोबत दाखल झाले होते; परंतु सकाळी ५ वाजेपासून माजी खासदार मधुकर कुकडे यांच्या नेतृत्वात स्थानिक लोकप्रतिनिधी व मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी विरोध केला. खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी डीआरएम व रेल्वेच्या बिलासपूर येथील महाव्यवस्थापकाशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. पुढील आदेशापर्यंत हे फाटक सुरू राहील, असा निर्णय घेण्यात आला.
हे फाटक बंद करण्याच्या निर्णय नागपूर रेल्वे प्रशासनाने घेतला होता. स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी त्याला विरोध दर्शविला होता. सकाळी नागपूर येथून रेल्वे सुरक्षा बलाचे मुख्य जया प्रकाश व जवान दाखल झाले होते. त्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य राजेश सेलोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य देवसिंग सव्वालाखे, सरपंच आशिष टेंभूरकर, उपसरपंच संजय लिल्हारे, स्टेशन टोलीचे उपसरपंच श्याम नागपुरे, शैलेश ठाकरे, सुरेंद्र सव्वालाखे, आलमखान, बादल खांडेकर, ए.के. पांडे, संदीप वाट, पप्पू यादव, बंटी नेवारे, विनोद कोकुडे यांच्यासह आदी नागरिक उपस्थित होते.
'त्या' पत्राकडे दुर्लक्ष; रेल्वेने फिरविला निर्णय
नागपूर विभागीय रेल्वेने २०१७ मध्ये भुयारी मार्गाचे बांधकाम केल्यानंतरच रेल्वे फाटक कायम बंद केले जाणार, असे देव्हाडी ग्रामपंचायतीला पत्र दिले होते; परंतु त्या पत्राकडे दुर्लक्ष करून येथे जबरदस्तीने फाटक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे नागरिकांचा विरोध झाला.
खासदार पडोळे यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा
- खासदार पडोळे यांनी सोमवारी देव्हाडी येथे आंदोलन सुरू असताना थेट दिल्लीवरून नागपूरचे डीआरएम दीपक कुमार गुप्ता व बिलासपूर येथील रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याशी
- भ्रमणध्वनीवर संपर्क साधून जनभावना कळविल्या. त्यानंतर पुढील आदेशापर्यंत फाटक बंद न करण्याचा निर्णय घेतला.
मधुकर कुकडे पहाटे पाच वाजता आले फाटकावर
- माजी खासदार मधुकर कुकडे सोमवारी सकाळी पाच वाजता देव्हाडी येथील रेल्वे फाटकावर आले. स्थानिक लोकप्रतिनिधी व परिसरातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने येथे गोळा झाले होते. फाटक बंद करू देणार नाही, असा इशारा माजी खासदार कुकडे यांनी दिला. अन्य फाटकावर असा निर्णय नसताना देव्हाडीतच का, या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर होते.
- रेल्वे मंडळ अभियंता निहाल नारायणे, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक मोगेसुद्दीन, स्टेशन अधीक्षक एम. मुरमू, स्टेशन अधीक्षक ऑपरेशन राहुल कुमार पांडे, पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे आदी अधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याकरिता ग्रामस्थांशी चर्चा केली.
५३२ क्रमांकाचे रेल्वे फाटक राहणार सुरू
नागरिकांच्या समस्यांचा विचार न करता वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतात. त्यामुळे नागरिकांना असुविधा निर्माण होऊ शकते. मात्र नागरिकांनी हा प्रकार हाणून पाडला.