१६ तास वीज पुरवठ्यासाठी उद्यापासून शेतकऱ्यांचे उपोषण; २५ गावात अनियमित वीज पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:48 IST2025-02-11T13:47:50+5:302025-02-11T13:48:27+5:30
Bhandara : जांभोरा परिसरातील शेतकऱ्यांचा करडी वीज कार्यालयाला इशारा

Farmers to go on hunger strike from tomorrow for 16-hour power supply; Irregular power supply in 25 villages
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील शेवटच्या टोकावर न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या जांभोरा व परिसरातील शेतकऱ्यांनी १६ तास अखंडित वीज पुरवठ्याची मागणी केली आहे. अन्यथा १२ फेब्रुवारीपासून करडी येथील विद्युत कार्यालयाजवळ उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
जांभोरा व परिसरातील गावे कृषिप्रधान असून शेती हा मुख्य व्यवसाय आहे. येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. मात्र, युती शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. जांभोरा व परिसरातील गावे जंगलालगत असल्याने मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी गावाकडे येत आहेत. शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरातील शेतकरी हतबल आहेत.
अनेकदा निवेदने देऊनही उपयोग शून्य
- शेतकऱ्यांकडून यापूर्वी अनेकदा निवेदन देऊन सलग १६ तास वीज पुरवठ्याची मागणी करण्यात आली. परंतु, कोणतीही ठोस पावले उचलली जात नाही, असा आरोप जांभोरा परिसरातील शेतकऱ्यांना आहे. अधिकारी या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसल्याची ओरड शेतकऱ्यांची आहे.
- आता आठ तास वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. अपुऱ्या वीज पुरवठ्याने उसाची शेती अडचणीत सापडली आहे. आता मका लागवडीकडे शेतकरी वळले आहेत.
लोकप्रतिनिधींचेही वीज समस्येकडे दुर्लक्ष
अधिकारी वीज समस्या सोडविताना दिसत नाही. त्याचबरोबर लोकप्रतिनिधीही या मुद्द्यावर अधिकारी व शासनास जाब विचारताना दिसत नाही. त्यामुळे नाइलाजाने उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शासनाने सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर
- शासनाकडून नेहमीच शेतकऱ्यांची उपेक्षा केली जात आहे. त्यांच्या अडचणी सोडविल्या जात नाही. निवडणुकीत मात्र शेतकऱ्यांची नावे घेऊन भले करण्याचे आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात भले होताना दिसत नाही. शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची असंतोषाची भावना शेतकऱ्यांत आहे.
- जांभोरा येथील उपसरपंच 3 यादोराव मुंगमोडे, ताराचंद समरीत, रमेश गोबाडे व असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उपोषण होणार आहे. त्यामुळे उपोषण सुरू करण्यापूर्वी विद्युत विभाग व शासन कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोडगा न निघाल्यास रपोषण लांबण्याचा धोका वाढला आहे