शेतकरी संकटात ! वांगी, पत्ताकोबी, फूलकोबी, टोमॅटोचे दर मातीमोल; आवक वाढल्याचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:38 IST2025-03-18T12:37:41+5:302025-03-18T12:38:31+5:30
Bhandara : १० रुपये किलो दराने पत्ताकोबीची होत आहे विक्री

Farmers in crisis! Prices of brinjal, cabbage, cauliflower, tomatoes skyrocket; Result of increased arrivals
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर कमालीचे गडगडले आहेत. फूलकोबी, पत्ताकोबी, टोमॅटो, वांगी १० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. पालक, कांदापात यासह इतर काही पालेभाज्यांचेही भाव पडले आहेत. भाजीपाला लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात आहेत. खर्च भागवायचा तरी कसा, असा प्रश्न विचारीत संताप व्यक्त करीत आहेत.
रब्बी हंगामाची काढणी झाल्यानंतर उपलब्ध पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली. यामुळे भंडारा शहरातील बाजारात भाज्यांची, भाजीपाल्यांची आवक वाढली आहे.
लसूण, अद्रक, कांद्याचे दरही पडले
गत २० दिवसांपासून शहरात लसूण व अद्रक ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. टेम्पो ठिकठिकाणी ग्राहकांना माल विक्रीसाठी आकर्षित करताना दिसून येत आहे. त्यातच पांढरा व लाल कांदाही १५ ते २० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.
वाहतूक खर्चही मिळत नाही
ठोक बाजारात किरकोळ बाजारापेक्षा ५० टक्के कमी दराने कोबी, वांगी, टोमॅटोची विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाल्याची काढणी करून विक्री करण्यासाठी लागणारा वाहतूक खर्चही मिळत नाही. शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
बाजारात दिसून येतोय भाज्यांचा ढीग
यंदा जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची शेती केली आहे. यामुळे बाजारात आवक वाढली आहे. भंडारा शहरात रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात फळभाज्यांसह पालेभाज्यांची आवक अधिक होती. सर्वत्र पालेभाज्या व फळभाज्यांचे ढीग दिसून आले.
महिनाभराने दर वाढण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज
सध्या अपवाद वगळता सर्वच भाजीपाला १० ते ३० रुपये किलोने विक्री होत आहे. मात्र, दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. यामुळे आवक कमी होऊन भाजीपाल्याचे दर दुपटीने चढण्याची शक्यता आहे.
टोपलीभर वांगी व टोमॅटो १० रुपयांत
गत महिनाभरापासून टोमॅटो व वांग्याचे दर कमालीने गडगडले आहेत. बाजारात मागणीपेक्षा पुरवठा अधिक होत असल्याने रविवारी टोपलीभर वांगी व टोमॅटो १० रुपयात विकले गेले.
"लेकराप्रमाणे जोपासना केलेला भाजीपाला मातीमोल दरात विकला जात असल्याने तोडणीचा खर्चही भागत नाही. उत्पादन खर्च निघणे तर दूरची बाब झाली आहे. मार्च महिन्यात कर्जाची चिंता सतावत आहे."
- श्रीकृष्ण वनवे, भाजीपाला उत्पादक.