धानाच्या पिकाला पाणी देताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 19:37 IST2023-08-08T19:37:21+5:302023-08-08T19:37:33+5:30
शेतावर बोरवेलद्वारे धानपिकाला पाणी देताना विद्युत ताराला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

धानाच्या पिकाला पाणी देताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : शेतावर बोरवेलद्वारे धानपिकाला पाणी देताना विद्युत ताराला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मुनेश्वर उर्फ बबलू महादेव सेलोकर (४७, चिचखेडा) असे या शेतकऱ्याचे नाव असून, ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता चिचखेडा (ता. मोहाडी) येथे घटली. मुनेश्वर सेलोकर यांची गावात घराला लागूनच शेती आहे.
आज सकाळी त्यांनी शेतीला पाणी देण्यासाठी बोरवेल सुरू केली. बोरवेलला विद्युत पुरवठा करणारा प्लास्टीक वायर पाण्यावर लोंबकळत असल्याने त्यांनी वर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वायर कटलेला असल्याने त्यांना विजेचा जबर धक्का लागून ते जागीच कोसळले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्यामागे दोन तरुण मुले, पत्नी आहे. बुधवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.