एन्ट्री द्या अन् खुशाल करा अवैध प्रवासी वाहतूक ! अपघातप्रवण मार्गावरून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन धावणारी धोकादायक वाहनांना परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 12:09 IST2024-08-24T12:08:52+5:302024-08-24T12:09:47+5:30
Bhandara : शेकडो वाहने धावतात योग्य प्रमाणपत्राविना रस्त्यावर

Entry to illegal passenger traffic! Permitting dangerous vehicles running on accident-prone routes carrying more than capacity passengers
गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामीण भागातून शहरात अनेक ऑटो, छोटा हत्ती, चारचाकी प्रवासी वाहने आणि मालवाहू येतात. मात्र यांपैकी बहुतांश वाहनाची वयोमर्यादा संपलेली आहे. अनेकांकडे पीयूसी प्रमाणपत्रही नाही. वाहनांचे पासिंगही नाही, तरीही ही वाहने सर्रास महामार्गावर धावत आहेत. अपघातप्रवण असलेल्या या मार्गावरून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन धावणारी ही वाहने धोकादायक असली तरी वाहतूक विभागाच्या 'मासिक' आशीर्वादाने हा प्रकार बिनदिक्कत सुरू आहे. भंडारा हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने या शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रोज हजारोंच्या संख्येने हे नागरिक विविध शासकीय कामांसाठी, खरेदीसाठी भंडारा शहरात येत असतात. विशेषतः मोहाडी आणि लाखनी मार्गावरून येणाऱ्यांची संख्या यात अधिक आहे. ऑटो तसेच अन्य चारचाकी वाहनांमधून हे प्रवासी शहरात येतात आणि परत जातातही.
जिल्हा परिषद चौक, पंचायत समिती, बसस्थानक, लालबहादूर शास्त्री चौकात ही वाहने प्रवाशांच्या शोधात असतात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविल्यावरच त्यांचा प्रवास सुरू होतो. या वाहनांच्या मार्गात महामार्ग पोलिस, चौकातील ट्रॅफिक पोलिस असले तरी त्यांचा प्रवास मात्र कसलीही आडकाठी न घालता बिनदिक्कत कसा होतो, हा अनेकांना आश्चर्यात पाडणारा प्रश्न आहे. कुण्याही पोलिस अधिकाऱ्याला किंवा वाहतूक पोलिसांना हा प्रकार दिसत कसा नाही, हासुद्धा प्रश्न आहे.
बसफेऱ्या कमी
एसटी महामंडळाच्या ग्रामीण भागात धावणाऱ्या बसफेऱ्या कमी आहेत. असलेल्या फेऱ्यांमधील वेळेचे अंतरही बरेच अधिक असल्याने खेड्यावरून येणाऱ्या ग्रामस्थांना ताटकळत बसावे लागले. याचा फायदा अवैध प्रवासी वाहतूकदार घेतात. भंडारा, लाखनी, मोहाडी यांसह अनेक बसस्थानकांसमोर या वाहतूकदारांची रांग दिसते. नाइलाजाने नागरिकांना जीव धोक्यात घालून या वाहनांमधून प्रवास करावा लागतो.
अधिकारी म्हणतात, असा प्रकारच नाही !
शहरातून बाहेरगावात होणाऱ्या प्रवासी वाहतुकीसंदर्भात भंडाराचे वाहतूक पोलिस निरीक्षक सुभाष बारसे यांना विचारणा केली असता, असा काही प्रकार नसल्याचे त्यांनी सांगितले. निर्लेखित झालेली वाहने संबंधित वाहनमालकांनी रस्त्यावर आणू नयेत. ऑटोचालकांनी आणि अन्य वाहनचालकांनी वाहनांची कागदपत्रे ठेवली तर कारवाई होणार नाही, असे ते म्हणाले.
महामार्ग पोलिस काय करतात?
भंडारा ते लाखनी मार्गावर महामार्ग वाहतूक पोलिसांची चौकी आहे. या चौकीसमोरूनच रोज ही वाहने प्रवासी घेऊन ये-जा करतात. मात्र महामार्ग पोलिसांकडून कडक तपासणी झाल्याचे कधी ऐकिवात नाही. मार्च एंडिंग, लग्नसराई, दिवाळीसारख्या दिवसांत या तपासणीला चांगलाच जोर चढलेला दिसतो. त्याचा फटका मात्र अवैध वाहतूकदारांपेक्षा सामान्य नागरिकांना आणि दुचाकीचालकांनाच अधिक बसतो.
अनेकांची कैफियत, उघड बोलणार कोण ?
- महिन्याची ठरावीक तारीख आली की महामार्गावर उभ्या असलेल्या 'साहेबां'ना खुश करावेच लागले. त्याशिवाय दुसऱ्या दिवशी वाहन रोडवर आणता येत नाही, असा अनेक प्रवासी वाहतूकदारांचा अनुभव आहे. मात्र उघडपणे बोलायला कुणी धजावत नाही.
- 'लोकमत'ने केलेल्या पाहणीत काही ऑटोचालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही आपबीती सांगितली.
- जेवढ्या पोलिस ठाण्यांच्या सीमांमधून जावे लागते, तेवढ्या ठिकाणच्या रस्त्यावरच्या साहेबांना खुश करावेच लागते. त्यात उशीरही चालत नाही, असा त्यांचा अनुभव आहे.