भंडारा जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 20:26 IST2025-12-19T20:23:18+5:302025-12-19T20:26:28+5:30
१५ जानेवारीला संपणार मुदत : प्रशासक पाहणार ग्रामपंचायतीचा कारभार

Elections to 148 Gram Panchayats in Bhandara district likely to be postponed
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबत चाललेल्या निवडणुकांमुळे १५ जानेवारीला ग्रामपंचायतीच्या मुदत संपणाऱ्या निवडणुकाही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. येत्या १५ जानेवारीला जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार आहेत. त्यांच्या निवडणुका किमान सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता प्रशासकीय पातळीवर व्यक्त होत आहे.
निवडणुका लांबल्याने ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीची शक्यता आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात जिल्हाभरात ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत संपणार आहे. तेथे निर्धारित वेळेत नवे सदस्य निवडून येण्यासाठी डिसेंबर महिन्यातच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित आहे; पण सध्या राज्यात नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. या सर्व निवडणुका ३१ जानेवारीअखेर संपविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या दृष्टीने हा कालावधी अपुरा आहे. त्यातच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे नवे ओझे अंगावर घेण्याची आयोगाची परिस्थिती नाही हे स्पष्ट दिसत आहे. निवडणुका लांबणीवर टाकण्याशिवाय पर्याय उरणार नाही. फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायती मोठ्या लोकसंख्येच्या आहेत.
...तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका दिवाळीतच
फेब्रुवारीतील निवडणुका लांबल्यास त्या आगामी किमान सहा ते आठ महिने घेता येणार नाहीत. मार्चपासून शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षांचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे निवडणुकीसाठी शाळांतील वर्गखोल्या आणि शिक्षक उपलब्ध होणार नाहीत. जूनपासून पावसाळा सुरू होतो. निवडणुका पावसाळा संपल्यावर म्हणजे दसरा-दिवाळीतच घ्याव्या लागणार आहेत.
निवडणुका का लांबणार?
ग्रामपंचायतीच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत, कारण प्रभाग रचना, आरक्षण प्रक्रिया आणि मतदार याद्या पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढ मागितली असून, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित असल्याने ग्रामपंचायतीवरही परिणाम होत आहे.
कायदेशीर तरतुदी
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ नुसार प्रशासकाला सरपंचाचे सर्व अधिकार-कर्तव्य मिळतात, जसे ग्रामसभा अंमलबजावणी व कर्मचारी नियंत्रण. निवडणुका न झाल्यास गावचा रहिवासी व मतदार असलेल्या व्यक्तीला प्रशासक नेमता येईल, ज्यामुळे दैनंदिन कामकाज सुरळीत चालेल.
विद्यमान सरपंचांना संधी
निवडणुका लांबल्यास विद्यमान सरपंचांना प्रशासक पदासाठी प्राधान्याने संधी मिळू शकते, ज्यामुळे त्यांचे पद सुरू राहील, अशी शक्यता आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे असून, पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने ही नियुक्ती होईल.
मुदत संपणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
भंडारा तालुका - ३५
तुमसर तालुका - १८
मोहाडी तालुका - १७
पवनी तालुका - २७
साकोली तालुका - २०
लाखनी तालुका - २०
लाखांदूर तालुका - ११
सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू
दोनच महिन्यांत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीत इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विशेषतः थेट सरपंचपदावर अनेकांचा डोळा असून पहिल्या टप्प्यात समाजमाध्यमांतून त्यांनी मतदारांवर फासे फेकायला सुरुवात केली आहे.