भंडारा जिल्हा दूध संघासाठी उद्या निवडणूक, घोडेबाजार तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 18:15 IST2025-06-27T18:14:29+5:302025-06-27T18:15:18+5:30

कोण मारणार बाजी ? : सहकाराचे लागले लक्ष

Elections for Bhandara District Milk Association tomorrow | भंडारा जिल्हा दूध संघासाठी उद्या निवडणूक, घोडेबाजार तेजीत

Elections for Bhandara District Milk Association tomorrow

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी २८ जूनला मतदान होत आहे. मतदानासाठी अवघे ४८ तास उरले असून या निवडणुकीतील घोडेबाजार तेजीत आला आहे. मतदारांच्या पळवापळवीसोबतच, प्रेमाच्या भेटींनाही वेग आला आहे.


१२ संचालक असलेल्या या दुध संघाच्या निवडणुकीसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसचे शेतकरी विकास पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत विलास काटेखाये नेतृत्वातील विकास यांच्या सहकार पॅनल समोरासमोर ठाकले आहे. यामुळे मोठी चुरस वाढली आहे.


प्रचाराला चांगलीच रंगत चढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे हे सहकार विकास पॅनलच्या पाठीशी आहेत. तर, रामलाल चौधरी यांच्या मदतीला काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे धावून आले आहेत. खुद्द त्यांचे बंधु विवेक पडोळे हे इतर मागासवर्गीय गटातून उभे असून त्यांची लढत शरद इटवले यांच्याशी आहे. यामुळे या गटाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


निवडणूक २८ तारखेला होत असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) सुदाम शेळके हे जबाबदारी सांभाळत आहेत. सध्या निवडणुकीतील घडामोडी वेगवान होत आहेत.


मध्यवर्ती बँक निवडणुकीची रंगीत तालिम
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली असून त्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करणे सुरू झाले आहे. २७ जुलैला ही निवडणूक होत आहे. त्यामुळे दूध संघाची निवडणूक म्हणजे रंगीत तालिमच मानली जातेय.


लाखनीत होणार तिरंगी
सामान्य प्रतिनिधी गटातून प्रत्येक तालुक्यातून एक संचालक असे ७संचालक निवडून द्यायचे आहेत. सामान्य प्रतिनिधी गटातील लाखनी वगळता सर्व ठिकाणी एकास एक लढत आहे. फक्त लाखनीमध्ये तीन उमेदवार असल्याने येथे तिरंगी लढत होत आहे.


दूध संघात १६९ मतदार
जिल्हा दुग्ध उत्पादन सहकारी संघाकडे मतदार फक्त १६९ आहेत. त्यामुळे घोडेबाजार वेगाात आहे. खात्रीलायक माहितीनुसार, चढ्या भावाने मतदार स्वतःची बोली लावत आहेत. असे असले तरी निवडणूक जिंकण्यासाठी नेत्यांनीही हात खुला सोडल्याची चर्चा आहे.

Web Title: Elections for Bhandara District Milk Association tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.