चिंता करू नका, अपना भी टाईम आयेगा ! भंडाऱ्यातील यात्रेत एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्त्यांना दिलासा
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: June 28, 2025 17:41 IST2025-06-28T17:40:17+5:302025-06-28T17:41:51+5:30
Bhandara : स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा

Don't worry, your time will come! Eknath Shinde's support to the workers
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कार्यकर्ते हीच पक्षाची आणि नेत्यांची खरी ताकद आहे. जे कार्यकर्त्यांना विसरतात, त्यांची गत आपण पाहिली आहेच. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे राजाचा मुलगा राज्य करणार नाही तर, काम करेल तोच राज्य करेल. त्यामुळे काम करत राहा. चिंता करू नका, अपना भी टाईम आयेगा, अशा शब्दात शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिला.
आभार यात्रेच्या निमित्ताने शिंदे यांची जाहीर सभा आणि कार्यकर्ता मेळावा स्थानिक रेल्वे मैदानावर झाला. यावेळी राज्यमंत्री आशीष जयस्वाल, आमदार मनिषा कायंदे, पक्षाचे पूर्व विदर्भ समन्वयक उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार सहसराम कोरटे, मनोहर चंद्रीकापुरे, डॉ. अश्वीनी भोंडेकर यांच्यासह विदर्भातील जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात एकनाथ शिंदे पुढे यांनी कुणाचेही नाव न घेता चिमटे काढले. ते म्हणाले, आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, मात्र या महाराष्ट्राला सोन्याचे दिवस आणण्यासाठी काम करतोय. सीएम असताना कॉमन मॅन म्हणून वावरलो. आज डीसीएम आहे. लोक प्रेमाने ‘डेडिकेटेड टू कॉम मॅन’ म्हणतात. पदे येतात आणि जातात. मात्र लाकडा भाऊ ही राज्यातील बहिणींनी दिलेली पदवी आपल्यासाठी सर्वात मोठी आहे. कितीही अफवा पसरवू द्या, मात्र ही योजना बंद होणार नाही. त्यासाठी पूर्ण तरतुद करून ठेवली आहे, प्रिंट मिस्टेक म्हणणारे आमचे सरकार नाही, असा चिमटा त्यांनी काढला.
उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे म्हणाले, त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा केली. काँग्रेससोबत घरोबा करून मराठी माणसाचा विश्वासघात केला. त्यामुळेच आम्ही उठाव केला. आम्ही सत्तेसाठी विचार आणि तत्वांशी प्रतारणा केली नाही. स्वाभिमानाने बाहेर पडलो. सर्वसामान्यांच्या मनातील सरकार स्थापले.
तर बाळासाहेबांनी प्रसंशा केली असती
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देशातील भगीनींचा सिंदूर पुसणाऱ्या पाकड्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धडा शिकवला. त्यांचे कंबरडे मोडून काढले. आज बाळासाहेब असते तर, यासाठी त्यांनी पंतप्रधानांची मुक्त कंठाने प्रसंशा केली असती. मात्र तुम्ही किती ड्रोन पाडले, हे विचारता. कुठे फेडणार हे पाप ?
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यावर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा. तोच स्वाभिमान, जीजाऊंचा आशीर्वाद आहे. एकजुटीने सोबत राहा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी
या दौऱ्यादरम्यान, एकनाथ शिंदे यांनी वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिली. विदर्भात जलपर्यटनाला वाव असून या प्रकल्पाचे काम दर्जेदार व्हावे,अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.भंडारा शहरातील खांब तलाव परिसरातील प्रभु श्रीराम मूर्तीचे दर्शन घेऊन परिसरातील कामाची पाहणीही केली.