प्रीपेड मीटर नकोच! वीज ग्राहक संघर्ष समितीची वीज कार्यालयावर धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 14:26 IST2025-01-23T14:25:28+5:302025-01-23T14:26:43+5:30
Bhandara : अधिकारी म्हणतात, ग्राहकांची परवानगी असेल तरच मीटर लावण्यात येईल

Don't want prepaid meters! Electricity Consumer Struggle Committee attacks electricity office
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : घरगुती वापराकरिता कुठलीही पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनीने भंडारा शहरात प्रीपेड मीटर लावण्याचे काम सुरू केले. प्रीपेड मीटरचा फटका सामान्य वीजग्राहकांच्या विरुद्ध आहे. यावर संतापलेल्या नागरिकांनी बुधवारी (दि. २२) वीजग्राहक संघर्ष समितीच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
मागण्यांचे निवेदन अधीक्षक अभियंता राजेंद्र गिरी यांनी स्वीकारले. तसेच वीजग्राहकांची परवानगी किंवा संमती असेल तरच स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लावण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. मोर्चाचे नेतृत्व समितीचे संयोजक जयश्री बोरकर, अजय मेश्राम, नितीन दुरगकर व अन्य सदस्यांनी केले.
यांनी नोंदविला सहभाग
स्मार्ट प्रीपेड वीज मीटर नको या बाबीवर बुधवारी राजीव गांधी चौकातील शिवार्पण टॉवर येथून महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. जिल्हा महिला काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चात जयश्री बोरकर, नितीन दुरगकर, नरेंद्र पहाडे, अजय मेश्राम, युवराज उके, संजय मते, नितीन धकाते, राजू देसाई, विनोद भुरे, शमीम शेख, पवन मस्के, रिजवान काझी, नितीन झरकारिया, प्रकाश भोंगाडे, देवेंद्र उरकुडे, नीळकंठ देशमुख, दीपक साठवणे, टिंकू खान, पृथ्वी तांडेकर, नीलिमा रामटेके, सतीश मानकर, कुंदा आगाशे, प्रज्ञा नंदेश्वर, भावना शेंडे, भूषण भोंगाडे, सुनील बारई, संजय पैगवार आदी उपस्थित होते.
पूर्वसूचना दिलीच नाही
शहरातील काही भागात वीज वितरण कंपनीने पूर्वसूचना किंवा कुठलीही माहिती न देता स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर लावण्याचा सपाटा सुरू केला. अनेकांनी याला विरोधही केला, मात्र कर्मचाऱ्यांनी मीटर लावले. याला संतापून नागरिकांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी धडक मोर्चा काढण्यात आला.
११ हजार रुपयांच्यावर स्मार्ट प्रीपेड मीटरची किंमत आहे.
प्रीपेड मीटर लावल्यानंतर किती रुपयांचे रिचार्ज केल्यावर किती युनीट वीज मिळेल हे सुद्धा कुठेही स्पष्ट करण्यात आले नाही. तसेच याबाबत जनजागृतीही केली नाही.
जबाबदारी वीज कंपनीची
"मीटर लावण्याला विरोध असतानाही वीज वितरण कंपनीने जबरदस्तीने मीटर लावल्यास उद्भवणाऱ्या असंतोषाला आम्ही कारणीभूत राहणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी वीज वितरण कंपनीची राहील."
- जयश्री बोरकर, संयोजक
पारदर्शकतेचा अभाव
"स्मार्ट विद्युत मीटरची सिंगल फेजसाठी २ हजार ६१० रुपये किंमत आहे, तर श्री फेज मीटरची किंमत ४०५० रुपये इतकी आहे. मात्र प्रीपेड विद्युत मीटरसाठी प्रत्यक्ष किंमत दुप्पट म्हणजेच ११ हजार ९८७ आहे. पारदर्शकतेचा अभाव व आर्थिक भार ग्राहकांवर लादण्यात येणार आहे. मीटर खरेदीसाठीची टेंडर प्रक्रियाही पारदर्शक राहिलेली नाही."
- नितीन दुरगकर, संयोजक
अन्यथा आम्ही उत्तर देऊ
"स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लावताना ग्राहकांची परवानगी घ्या. परवानगी नसताना वीज मीटर लावण्यास आम्ही आपल्या स्टाइलने उत्तर देऊ, असा खणखणीत इशाराही आम्ही दिला आहे. यावर वीज कंपनीने विचार करावा."
- नितीन धकाते, भंडारा