आरोग्य केंद्रात डॉक्टरचे कोंबडीपालन, ठोस कारवाई कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:55 IST2025-08-06T12:54:49+5:302025-08-06T12:55:28+5:30
Bhandara : डॉक्टरांच्या कोंबड्यांनी उडवली 'आरोग्य'यंत्रणेची झोप! तातडीने सफाई, पण कारवाई अद्याप नाही

Doctor's chicken farming at health center, when will concrete action be taken?
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघोरी मोठी (जि. भंडारा) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातच डॉक्टरकडून कोंबड्या पाळल्या जात असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मंगळवारी या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली. जिल्हा आणि तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी केंद्राची पाहणी केली. अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर आरोग्य केंद्राच्या प्रभारी डॉ. चंदू वंजारे यांनी तातडीने आवारातून कोंबड्या हलवून संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. मात्र, या प्रकरणी ठोस कारवाई कधी करण्यात येईल, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र हे रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे ठिकाण असताना, येथील डॉ. वंजारे यांनी शासकीय निवासस्थानाच्या नावाखाली आरोग्य केंद्राच्या आवारातच मोठ्या प्रमाणात कोंबड्या पाळल्या होत्या. या कोंबड्यांमुळे केंद्राच्या परिसरात अस्वच्छता पसरली होती. दुर्गंधी, घाण आणि दूषित वातावरणामुळे येथील कर्मचाऱ्यांसह रुग्णांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला होता. पाहणीदरम्यान, अधिकाऱ्यांना आरोग्य केंद्राच्या आवारात कोंबड्या व अस्वच्छता दिसून आली. पुढील कार्यवाही तालुका आरोग्याधिकारी यांच्या अहवालानुसार केली जाईल. मात्र, या कारवाईत अधिक परिणामकारक कृती झालेली नाही, असे दिघोरी मोठी येथील नागरिकांचे म्हणणे आहे.