प्रचाराचे व्हिडीओ बनविताना धार्मिक स्थळ, चिन्हांचा वापर नको
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 11:27 IST2024-10-26T11:26:41+5:302024-10-26T11:27:16+5:30
Bhandara : काळजी घ्या; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Do not use symbols of religious places while making promotional videos
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : निवडणुकांमध्ये प्रचारासाठी उमेदवारांच्या कार्यकर्तृत्त्वाचा अहवाल देणारा व्हिडीओ तयार करण्याची सर्वमान्य प्रक्रिया आहे. मात्र, ही प्रक्रिया किचकट असते. त्याला वेळ लागतो. त्यामुळे हा व्हिडीओ बनवतानाच भारत निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनांचे पालन केल्यास त्याची मान्यता तातडीने मिळण्यास मदत होईल. त्यामुळे आयोगाला अमान्य असणाऱ्या गोष्टी टाळण्याच्या आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
निवडणुकीत उमेदवारांचे हे सर्व व्हिडीओ माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण कक्षाकडून मान्यता प्राप्त असणे आवश्यक आहे. त्यामुळे मान्यतेला देण्यापूर्वीच या व्हिडीओमध्ये काय असावे, काय असू नये, हे जाणून घेणे आवश्यक आहे. वृत्तपत्रांच्या अर्थात प्रिंट मीडियाच्या जाहिरातीसंदर्भात शेवटचे दोन दिवस परवानगी घेणे आवश्यक आहे.
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दिशानिर्देश दिले आहे. कार्यक्रम संहितेनुसार व्हिडीओमध्ये अभिरुचीहीन किंवा सभ्यता विरुद्ध प्रसारण, मित्र देशांवर टीका, धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणारे दृश्य, किंवा शब्दांचा समावेश असलेले चित्रण, अश्लील, बदनामीकारक, जाणीवपूर्वक, चुकीचे किंवा अर्धसत्य माहिती, प्रसारण, हिंसेला प्रोत्साहन, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे, न्यायालयाचा अवमान करणारी टिपणी करू नये.
तसेच राष्ट्रपती आणि न्यायपालिकेच्या सचोटीविरुद्ध आक्षेप व्यक्त करणारे प्रसारण, राष्ट्रीय ऐक्यास बाधा आणणारे प्रसारण, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे चित्रण, महिलांचे विकृतीकरण दर्शवणारे चित्रण, या शिवाय सीनेमेट्रोग्राफ कायदा १९५२च्या तरतुदीचे उल्लंघन करणारे प्रसारण दाखवू नये.