बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी; ग्रामीण मार्गावर बससेवांचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:30 IST2025-05-16T14:29:48+5:302025-05-16T14:30:22+5:30

वाढलेल्या प्रवाशांच्या तुलनेत बसफेऱ्या कमी : प्रवाशांना सहन करावा लागतो मानसिक त्रास

Crowd of passengers at the bus stand; Shortage of bus services on rural routes | बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी; ग्रामीण मार्गावर बससेवांचा तुटवडा

Crowd of passengers at the bus stand; Shortage of bus services on rural routes

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
शाळा, महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यातच जिल्ह्यात विवाह सोहळ्याची धूम आहे. परिणामी, जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकासह तालुकास्तरीय बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. विशेषतः भंडारा बसस्थानकावर गत दोन महिन्यांपासून गर्दी होत आहे. मात्र, दोन आठवड्यांपासून अनेक ग्रामीण भागात बसगाड्यांचा तुटवडा निर्माण झाला असल्याने प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता बससेवा वाढविण्याची मागणी होत आहे.


उन्हाळी सुट्यांमुळे विद्यार्थ्यांना गावी जाण्याची घाई असते. नातेवाईक, मित्रमंडळींत विवाहकार्यासाठी जाण्याची लगबग असते. यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन व्यवस्थेवर ताण वाढला आहे. भंडारा बसस्थानकात दररोज सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी होत असते.


अनेकदा नागरिकांना बसमध्ये उभे राहून प्रवास करावा लागतो. बस न मिळाल्यास तासनतास ताटकळत बसावे लागते. बसेसच्या पुढे खासगी वाहने धावायची. परंतु, आता खासगी अवैध प्रवाशी वाहतूक बंद पडली आहे.


ग्रामीण भागासाठी मोजक्याच बसेस
ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या बसेस दिवसभरात ठराविकच वेळा चालविल्या जातात. तुरळक बसफेऱ्यामुळे प्रवाशांना वेळेवर बस न मिळाल्यास दुसऱ्या फेरीसाठी अनेक तास थांबावे लागते. प्रवाशांची संख्या वाढत आहे.


खासगी वाहनांकडे प्रवाशांची पाठ
चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात अवैध प्रवाशी वाहतुकीचे लोण गाव-खेड्यापर्यंत पसरले होते. यातून अनेक बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हायच्या. परंतु, यामुळे बससेवा अडचणीत सापडली होती.


वाढीव बसफेऱ्या शहरांपुरत्या, गावांत शुकशुकाट
भंडारा विभागातील ६ आगारांमधून ३८४ बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यातच गर्दीमुळे होणारी गैरसोय थांबविण्यासाठी भंडारा विभागाने १ मेपासून अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा आणि पवनी बसस्थानकांवरून अतिरिक्त बससेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु, बहुतेक बसेस शहरांपुरत्या मर्यादित असल्याने ग्रामीणांची गैरसोय होत आहे.


वाढत्या गर्दीमुळे रेल्वेतही आरक्षण मिळेना
सध्या भंडारा व तुमसर रोड स्टेशनवरून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. अन्य वाहनांच्या प्रवाशापेक्षा रेल्वेचा प्रवास स्वस्त मानला जातो. परंतु, अनेक दिवसांपासून रेल्वेत आरक्षण मिळेनासे झाले आहे. ऑटोचालकांकडून वाजवीपेक्षा अधिक, अनेकदा मनमर्जीने भाडे घेतले जात असल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसतो आहे.


५० % सवलतीमुळे पालटले चित्र 
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने महिलांसाठी ५० टक्के तिकिटात प्रवास सवलत, अमृत योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकही बसचा पर्याय स्वीकारत असल्याने गर्दीत वाढ झाली आहे.
 

Web Title: Crowd of passengers at the bus stand; Shortage of bus services on rural routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.