बहुचर्चित सोनी हत्याकांड प्रकरणात सातही जणांवर आरोप निश्चिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 13:05 IST2023-04-10T13:02:55+5:302023-04-10T13:05:06+5:30
उद्या मंगळवारी सुनावणार निर्णय

बहुचर्चित सोनी हत्याकांड प्रकरणात सातही जणांवर आरोप निश्चिती
इंद्रपाल खटकवार
भंडारा : जिल्ह्यातील तुमसर येथील बहुचर्चित सोनी हत्याकांड प्रकरणात भंडारा जिल्हा न्यायालयाने सात जणांवर आरोप निश्चिती केली आहे.
आज सोमवारी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांच्या न्यायालयात सातही जणांना उपस्थित करण्यात आले होते. यावेळी न्यायमूर्ती अस्मर यांनी सातही जणांवर सोनी हत्याकांडातील तिघा जणांच्या निर्दयपणे हत्या, लक्षावधी रुपयांच्या ऐवजांची लूटपाट करणे पुरावे नष्ट करणे याबाबत दोषारोप सिद्ध केले आहेत. आता यावर निर्णय उद्या मंगळवारी ११ एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता उद्या या सात जणांवर कोणती शिक्षा ठोठावली जाते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.