आचारसंहिता संपली, आता उर्वरित रेशन कार्डधारकांना मिळणार साडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:20 IST2024-07-02T13:19:55+5:302024-07-02T13:20:43+5:30
Bhandara : रेशन कार्डधारकांना शिल्लक राहिलेल्या साड्यांचे वितरण

remaining ration card holders will get sarees
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्य शासनाकडून अंत्योदय रेशन कार्ड असणाऱ्या लाभार्थ्यांना एक साडी भेट देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर साडी वाटपास ब्रेक लागला होता. आता आचारसंहिता शिथिल झाल्यामुळे साडी वाटप सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यात शिल्लक असलेल्या लाभार्थ्यांना साडी वाटप सुरू करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आल्या आहेत. शासनाने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्यातील अंत्योदय रेशनकार्डधारक लाभार्थीना वर्षातून एकदा मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मार्च महिन्यापासून रेशन दुकानांमधून या साड्यांचे वितरण सुरू करण्यात आले होते.
भंडारा जिल्ह्यातील सुमारे ६६ हजार १०४ अंत्योदय रेशनकार्डधारकांना साडी वाटपाचे नियोजन करण्यात आले. हातमाग विकास महामंडळाकडून लाल, हिरवा, पिवळा व निळ्या अशा चार रंगात या साड्यांचा पुरवठा शासनास करण्यात आला होता. यानुसार, भंडारा जिल्ह्यात प्राप्त झालेल्या साड्याचे वाटप सुरू करण्यात आले होते. पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना प्रणालीवर आधारित पीओएस यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. याच नवीन यंत्रावर साडी वितरीत केल्याची नोंद करण्यात आलेली आहे. पूर्वी साडी मिळालेल्या लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे.
१६ मार्चपासून वितरण थांबले
• केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली होती. या दिवसापासून देशात आचारसंहिता लागू करण्यात आली होती. यामुळे साडी वाटप थांबवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
• जिल्ह्यात सुमारे ६६ हजार अंत्योदय कार्डधारक आहेत. यातील ६० टक्के लाभार्थ्यांना साड्यांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांना साडी वाटप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पीओएस यंत्रावर नोंद
• उर्वरित लाभार्थ्यांनाच साडी मिळणार आहे. १६ मार्चपासून साडी वाटप थांबवण्यात आले होते. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर साडी वाटप करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.
• यामुळे अनेक लाभार्थ्यांचे साडी वाटप रखडले होते. आता त्या उर्वरित लाभार्थ्यांना साडी वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. रेशन दुकानधारकांकडे असणाऱ्या पीओएस यंत्रावर नोंद केल्यानंतर साडी लाभार्थ्यांच्या हातात पडणार आहे.
"आचारसंहितेमुळे साडी वाटप थांबविण्यात आले होते. निवडणूक पार पडल्यामुळे साडी वाटप करण्याच्या सूचना रेशन दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. ज्या कुटुंबातील लाभाथ्यर्थ्यांना साडी मिळालेली नाही. अशा लाभार्थ्यांनी रेशन दुकानावर जाऊन साडी घेऊन जावी."
- नरेश वंजारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा.