भंडाऱ्यातील नागरिकांना होतोय लोड शेडींगचा त्रास; ब्रेक डाऊनच्या नावाखाली भारनियमन केले जाते का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:04 IST2025-03-07T14:03:17+5:302025-03-07T14:04:09+5:30
उन्हाळ्यात जीव उकळून निघणार ? : शहरांसह ग्रामीण भागात विजेच्या मागणीत होतेय वाढ

Citizens of Bhandara are facing load shedding problems; Is load management being done in the name of break down?
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उन्हाचा तडाखा वाढला तसे वीजमीटर पळू लागले आहे. वाढत्या वीजवापरामुळे शहरांसह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत असून, घामाघूम होत आहेत.
पूर्वी हिवाळ्यात शेतीसाठी विजेच्या मागणीत वाढ होत असल्यामुळे तीन ते चार महिने वीजटंचाई निर्माण होत असे. अलीकडच्या काळात मात्र बाराही महिने वीजसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. सध्या शेतीसाठी केवळ आठ तास वीजपुरवठा करण्यात येतो. तोही सुरळीत होत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड होत आहे. शहरी भागातही वीज समस्येला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. किमान या दिवसांत तरी महावितरणने वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी वीजग्राहकांतून होत आहे. वीजबिलापोटी थकबाकीचा डोंगरही वाढत असून वसुलीस अडचणी येत आहे.
दिवसरात्र राहतात फॅन, एसी, कूलर फूल स्पीडवर !
फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच प्रखर ऊन आणि वातावरणात उकाडा जाणवत आहे. त्यामुळे फॅन, एसीचा वापर वाढला असून, वीजमीटर पळू लागले आहे. अडगळीत पडलेले कूलरही आता दुरुस्तीसाठी काढण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ब्रेक डाऊनच्या नावाखाली भारनियमन केले जाते का?
सध्या शहरात भारनियमन करण्यात येत नसले, तरी ग्रामीण भागात मात्र ब्रेकडाऊनच्या नावाखाली भारनियमन सुरू आहे. शेतीसाठी तर केवळ आठ तास वीजपुरवठा करण्यात येतो. अशा परिस्थितीत पिकांना पाणी कसे द्यावे? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.
तर तेथे जास्त भारनियमन
विजेच्या मागणीत वाढ होत आहे, तर दुसरीकडे वीजगळतीही वाढत आहे. त्यामुळे पुरवठा सुरळीत करणे महावितरणपुढे आव्हान ठरत आहे. त्यातच वीजचोरीचे प्रकारही सुरू असल्याने डोकेदुखी वाढली आहे
आता ही स्थिती तर पुढे काय?
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच वीज समस्या गंभीर बनत चालली आहे. येणाऱ्या दिवसांत तर विजेच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांना वीज समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.
वाढते ऊन अन् वीजदर फोडतोय ग्राहकांचा घाम
महिनाभरापासून प्रखर ऊन आणि वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. अशा वातावरणाचा आबालवृद्धांना त्रास होत आहे. नागरिकांना फॅन, एसी, कूलरशिवाय घरात बसणेही शक्य होत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
८ तास कृषीपंपांना होतोय वीज पुरवठा
मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा सुरु झाला आहे. त्यामुळे विजेवर आधारित उपकरणांचा वापर वाढला आहे. वीज पुरवठा खंडितने समस्या वाढली आहे.