अन् त्याने वडिलांचे एका बुक्कीत दोन दात पाडले; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 17:31 IST2022-08-04T17:30:41+5:302022-08-04T17:31:44+5:30

पत्नीला मारहाण करताना अडविल्याचा राग, लाखनी तालुक्यातील घटना

case filed against son for beating father | अन् त्याने वडिलांचे एका बुक्कीत दोन दात पाडले; गुन्हा दाखल

अन् त्याने वडिलांचे एका बुक्कीत दोन दात पाडले; गुन्हा दाखल

भंडारा : पत्नीला मारहाण करीत असलेल्या मुलाला अडविल्याने मुलाने चक्क एका बुक्कीत आपल्या वडिलांचे दोन दात पाडले. ही घटना लाखनी तालुक्यातील परसोडी येथे बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अण्णा तुळशीराम राऊत (६५, रा. परसोडी) असे जखमी वडिलांचे नाव आहे. तर पवन अण्णा राऊत (३५) असे आरोपी मुलाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी पवन आपल्या पत्नीला मारहाण करून तिचे कपडे घराबाहेर फेकत होता. त्यावेळी त्याची आई मध्ये आली. तिलाही मारहाण करू लागला. हा प्रकार पाहून वडील अण्णा राऊत मध्ये आले.

तू कशाला पत्नीला मारतो असे म्हटले. त्यावेळी आरोपी हातात बांबूची काठी घेऊन वडिलांना मारण्यास धावला. त्याने काठीचा एक प्रहार डोक्यावर केला. त्यानंतर एक जोरदार बुक्की तोंडावर मारली. त्यात वडील अण्णांचे दोन दात पडले. याप्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला. त्यावरून पवन राऊत विरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: case filed against son for beating father