गोसे प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात मालवाहू वाहन पडले, चार गंभीर
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: January 22, 2024 16:42 IST2024-01-22T16:39:34+5:302024-01-22T16:42:14+5:30
कोदुर्लीजवळ घटना घडली, रस्ता रुंदीकरणातील कासवगती कारणीभूत.

गोसे प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात मालवाहू वाहन पडले, चार गंभीर
गोपालकृष्ण मांडवकर, भंडारा : गोसे खुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या पुलावर मालवाहू वाहन उलटून कालव्यात पडले. यात चालकासह चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. हा अपघात पवनी ताालुक्यातील कोदुर्ली गावालगतच्या विविध सेवा सहकारी संस्थेच्या गोडाऊनजवळ घडला.
जखमींमध्ये विलास रामकृष्ण सलामे (४२), निलेश नामदेव वासनिक (४०), गौतम छगन हुमणे (२२), सचिन नारायण हुमणे (४२) यांचा समावेश आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक एच ३३ ऐसी ६३८२ असून हे वाहन पवनीकडून शेळी या गावाकडे निघाो होते. पवनी ते सावरला या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पुलाच्या कठड्यावर आदळले. त्यानंतर १५ फुट खोल कालव्यात पडले. त्यामुळे वाहनाचा समोरील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या अपघाताची माहिती देवचंद सावरबांधे यांनी पवनी पोलिस स्टेशनला दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे करीत आहेत.
रस्ता रुंदीकरणात कासवगती :
मागील अनेक दिवसांपासून या मार्गच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. महामार्गावरील वाहतूक वळविल्याने या मार्गावरील रहदारी वाढली आहे. मात्र कामातील कासवगतीमुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण अलिकडे वाढले आहेत. कामाची गती न वाढविल्यास भविष्यात अपघाताची संख्या वाढण्याची शक्यता आहे.