उमेदवारांनो, खर्चाचा तपशील न दिल्यास याल अडचणीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 11:19 IST2024-11-29T11:15:33+5:302024-11-29T11:19:42+5:30

Bhandara : २३ डिसेंबरपर्यंत खर्च निवडणूक शाखेकडे सादर करण्याची मुभा

Candidates, if you don't give details of expenses, you will be in trouble! | उमेदवारांनो, खर्चाचा तपशील न दिल्यास याल अडचणीत !

Candidates, if you don't give details of expenses, you will be in trouble!

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता प्रत्येक उमेदवाराला झालेल्या खर्चाचे तपशील द्यावा लागणार आहे. निकाल लागल्यापासून एक महिन्याच्या आत म्हणजेच २३ डिसेंबरपर्यंत उमेदवाराला आपला खर्च निवडणूक शाखेकडे सादर करावा लागणार आहे. संबंधित उमेदवारांकडून पुढील आठवड्यापासून खर्चाचा तपशील जमा होण्यास सुरुवात होईल. त्यात काही तफावत आढळल्यास त्याबाबत नोटीस पाठवून खुलासा मागविला जाईल. निवडणूक कालावधीत उमेदवारांनी प्रचारासाठी केलेल्या खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक आहे.


भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बँक खाते उघडून त्यातूनच व्यवहार करणे आवश्यक होते. निवडणुकीसाठी उघडलेल्या बँक खात्यातून उमेदवाराने आपला निवडणूक खर्च धनादेश धनाकर्ष, आरटीजीएस, एनईएफटीद्वारे करणे आवश्यक आहे. जाहिरातीचा खर्च निवडणूक खर्चाची बाब म्हणून गणली जाणार आहे. उमेदवारांना खर्चाची लिखित नोंद ठेवावी लागते.


भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या लेखांची तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडून मतदान होण्यापूर्वी तीन वेळा करावी लागते. उमेदवारांना नोंदवही दिलेली असून, त्यांनी केलेला खर्च व्यवस्थितरीत्या लिहावा असे अपेक्षित आहे. लिहिलेल्या नोंदी तपासून खर्च निरीक्षकांची स्वाक्षरी घेणे हे उमेदवार अथवा उमेदवाराचे प्राधिकृत प्रतिनिधी यांचे काम असते. त्यात तफावत असल्यास उमेदवारांना नोटीस जारी करण्यात येते. खर्चाच्या नोंदी नीट लिहाव्या, यासाठी मार्गदर्शनही केले जाते. प्रशिक्षणाद्वारे नोंदी कशा घ्याव्या हे सांगण्यात आलेले आहे


२३ डिसेंबरपर्यंत द्यावा लागणार तपशील 
विधानसभा निवडणुकीसाठी ४० लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा होती. अर्ज भरल्याच्या दिवसापासून निवडणुकीदरम्यान सर्व उमेदवारांना टप्प्याटप्प्याने खर्चाचे हिशेब द्यावे लागत होते. आता विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत म्हणजेच २३ डिसेंबरपर्यंत निवडणूक खर्चाचा तपशील उमेदवारांना सादर करावा लागणार आहे.


५० उमेदवारांनी लढली निवडणूक
जिल्ह्यातील तीन मतदारसंघांतील ५० उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. सर्वाधिक उमेदवारांची संख्या ही भंडारा मतदारसंघात १९ एवढी होती. त्यामुळे मतदानासाठी दोन ईव्हीएम मशीन लागल्या होत्या. तुमसर मतदारसंघात १८ उमेदवार होते. सर्वांत कमी उमेदवार साकोली मतदारसंघात केवळ १३ उमेदवार असल्याने एकच ईव्हीएमचा वापर करावा लागला.


कोणत्या मतदारसंघातून किती?
मतदारसंघ           उमेदवार 

तुमसर                      १८ 
भंडारा                      १९ 
साकोली                    १३ 
एकूण                       ५० 


खर्च सादर न केल्यास निवडणूक लढण्यावर बंदी

  • जिल्ह्यात निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा अंतिम हिशेब देण्यासाठी २३ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत सर्व उमेदवारांना निवडणूक खर्चाची तपशील निवडणूक शाखेकडे जमा करावा लागणार आहे.
  • संबंधित उमेदवारांकडून पुढील आठवड्यापासून खर्चाचा तपशील जमा होण्यास सुरुवात होईल. त्यात काही तफावत आढळल्यास त्याबाबत नोटीस पाठवून खुलासा मागविला जाईल. खर्च सादर न केल्यास संबंधित उमेदवारास पुढे निवडणूक लढण्यावर बंदी आणली जाऊ शकते.


 

Web Title: Candidates, if you don't give details of expenses, you will be in trouble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.